ब्रेकिंग! राहुरी कारागृहात दोन कैद्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

विलास कुलकर्णी
Tuesday, 28 July 2020

राहुरी कारागृहात पोलिस कोठडीतील दोन कैदी मंगळवारी (ता. २८) कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

राहुरी (अहमदनगर) : राहुरी कारागृहात पोलिस कोठडीतील दोन कैदी मंगळवारी (ता. २८) कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सात कैदी खोकल्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे, कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संगमनेर कारागृहातील चार कैद्यांना चार दिवसापूर्वी राहुरी कारागृहात आणले होते. कणगर (ता. राहुरी) येथे मोबाईल टॉवरच्या बॅटर्‍या चोरीप्रकरणी त्यांना राहुरी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या चार कैद्यांना राहुरी कारागृहातील बरॅक नं. एक मध्ये ठेवले होते. त्यांच्या कोरोना तपासणी अहवालात दोन कैदी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे, चार दिवसांपासून कारागृहातील सुरक्षा पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना तपासणीसाठी कृषी विद्यापीठातील कोवीड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. 

राहुरी कारागृहातील बरॅक नंबर एकमध्ये ११ कैदी आहेत. त्यांचीही कोरोना तपासणी केली जाणार आहे. कारागृहातील सात कैद्यांना खोकला सुरू आहे. संगमनेर येथे कैद्यांना आणण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकालाही कोरोना तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे, पोलिस कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. कारागृहाच्या शेजारी असलेल्या तहसील कार्यालयातील एक महिला कर्मचारी यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. एक तलाठी व एक मंडलाधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महसूल पाठोपाठ पोलिस खात्यातही कोरोनाची बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संगमनेर कारागृहातून आणलेले कैदी कोरोनाबाधित आढळल्याने, संगमनेरच्या कारागृहातील कैद्यांची सुद्धा कोरोना तपासणी होणार असल्याचे समजते.

मंगळवारी सकाळी चार कैदी व एका पोलिसाची रॅपिड कोरोना टेस्ट घेतली. त्यात, दोन कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे, कारागृहात सुरक्षेसाठी तैनात सात पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.  रॅपिड टेस्ट किट संपल्याने, इतर पोलिसांची कोरोना तपासणी उद्या केली जाईल. 
- डॉ. नलिनी विखे, तालुका आरोग्य अधिकारी, राहुरी

 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two prisoners were infected with corona in Sangamner taluka