धोकादायक पर्यटनस्थळी सुरक्षा गरजेची; पारनेर तालुक्‍यात दोन पर्यटकांनी गमावला जीव

मार्तंड बुचुडे 
Thursday, 29 October 2020

रुईचोंढा व निघोज येथील रांजणखळगे परिसरात दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला, तसेच एक जण वाहून बेपत्ता झाला.

पारनेर (अहमदनगर) : तालुक्‍यात अनेक पर्यटनस्थळे आहेत; मात्र अलीकडे रुईचोंढा व निघोज येथील रांजणखळगे परिसरात दोन पर्यटकांना जीव गमवावा लागला, तसेच एक जण वाहून बेपत्ता झाला. त्यामुळे ही पर्यटनस्थळे धोकादायक ठरत आहेत. पर्यटकांचा वाढता ओघ विचारात घेता, तेथे कायमस्वरूपी सुरक्षाव्यवस्था गरजेची आहे. 

तालुक्‍यात निघोज येथील रांजणखळगी व वडगाव दर्या येथील लवणस्तंभ जगप्रसिद्ध आहेत. राळेगणसिद्धी येथील जलसंधारणाची कामे, रुईचोंढा धबधबा, मांडओहोळ धरण, कोरठण खंडोबा, सिद्धेश्वर मंदिर, पळशीचे मंदिर, टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर मंदिर, पिंपळनेर येथील श्री संत निळोबारायांचे मंदिर आदी ठाकाणे प्रेक्षणीय व पर्यटकांना खुणावणारी आहेत. दर वर्षी अनेक पर्यटक त्यांना भेटी देतात. त्यामुळे त्या-त्या परिसरातील व्यापार, आर्थिक उलाढाल हळहळू वाढत आहे. 

कोरोना संकटामुळे सध्या पर्यटनस्थळी जाण्यास मज्जाव आहे. मात्र, अशी ठिकाणे विकसित होत असताना तेथे आणखी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यातून पर्यटकांची वर्दळ वाढेल व व्यावसायांना चालना मिळेल. यातून तालुक्‍याच्या विकासालाही गती मिळणार आहे. 

गेल्या काही दिवसांत रुईचोंढा व रांजणखळग्यांच्या परिसरात झालेल्या दुर्घटनांमुळे ही पर्यटनस्थळे धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे तेथे पर्यटकांचा ओघ कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी तेथे सरकारी पातळीवर 24 तास सुरक्षाव्यवस्था तैनात करणे काळाची गरज आहे. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेला सुंदर व आकर्षक रूईचोंढा (ता. पारनेर) धबधबा पाहण्यासाठी शिरूर (जि. पुणे) येथून मित्रांसमवेत आलेल्या श्रेयस जामदारचा सोमवारी (ता. 25) बुडून मृत्यू झाला. एक महिन्यापूर्वी गणेश अश्रूबा दहिफळे (रा. खरवंडी कासार, ता. पाथर्डी) याचाही याच धबधब्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह 50 तासांनंतर धबधब्यापासून सुमारे चार किलोमीटरवर वासुंदे गावाजवळील ठाकरवाडीत सापडला होता. पाणबुड्यांनाही शोध घेण्यात अपयश आले होते. 

रांजणगाव गणपती येथील रिक्षाचालक इसाक तांबोळी गेल्या मंगळवारी (ता. 20) निघोजजवळील रांजणखळग्यात वाहून गेला. त्याचा शोध अद्याप लागला नाही. 
एकंदरच, तालुक्‍यातील पर्यटनस्थळांचा विकास होत आहे; मात्र दुर्घटना घडू लागल्या, तर पर्यटकांना ब्रेक लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अशा धोकादायक पर्यटणस्थाळी कायमस्वरूपी रखवालदार नेमणे गरजेचे आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two tourists killed in Parner taluka