रात्री ‘ते’ घरात झोपलेले असतानाच उचलले अन्‌ रुग्णवाहिकेत टाकले

शांताराम काळे
Monday, 3 August 2020

पुणे व चाकण येथे कामाला असलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे बहाद्दर उपचार घेत असतानाच पळाले.

अकोले (अहमदनगर) : पुणे व चाकण येथे कामाला असलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे बहाद्दर उपचार घेत असतानाच पळाले. एकजण धामनवन व एकजण बांगरवाडी (कौठवाडी) येथे पोहचला. आरोग्य प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती नगर आरोग्य विभाग व पोलिस यांना कळवली. मग त्या दोघांची शोधा शोध झाली. 

त्यातील एकाने घरी न जाता थेट धामणवन या आपल्या सासुरवाडीला धूम ठोकली. मात्र पोलिस व आरोग्य विभागाने त्यांचा शोध घेऊन अखेर त्यांना खानापूर (ता. अकोले) येथील कोव्हिड केंद्रात दाखल केले. तर त्यांचे नातेवाईकही संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांचे स्वाब तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहेत.

बांगरवाडी येथील २२ वर्षाचा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. तर मूळचा कातळापुर येथील २९ वर्षाचा तरुण चाकण येथील कंपनीत काम करीत होता. त्या दोघांनाही कोरोनाचीबाधा झाली. त्यांना पुणे येथील आरोग्य विभागात दाखल करण्यात आले. मात्र हे दोघे बहाद्दर रात्रीच तेथून आले. एकाच रूममध्ये राहणारे अजून दोघे चिंचवणे येथील तेही त्याच्या सोबत पळाले. 

कंपनीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही त्यांच्या घरी फोन करून ते पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तोपर्यंत पोलिस, आरोग्य कर्मचारी व १०८ रुग्णवाहिका रात्री ते घरात झोपलेले असताना पोहचली.

सकाळी २७ नातेवाईकनाही रुग्णवाहिकेत बसवून त्यांचे स्वॅब घेतले. 
ही माहिती समजताच धामनवन, कौठवाडी, कातळापुर येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त करून गावात अजून कोणी नवीन आले आहेत काय? याचा शोध सुरू केला आहे. राजूरच्या सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले. 

डॉ. इंद्रजित गंभीरे म्हणाले, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी तालुक्यात येऊन तालुक्यच्या आरोग्य बिघडवू नये, त्यामुळे हा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल. असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई देखील केली जाईल. आपल्या गावात नवीन येणाऱ्या व्यक्तीची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला द्यावी, असे आव्हान त्यांनी केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two who were corona positive escaped from Pune and Chakan