esakal | उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती - शंकरराव गडाख
sakal

बोलून बातमी शोधा

Shankarrao Gadakh

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती - शंकरराव गडाख

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि. नगर) : ‘‘शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, मागील पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कोरोनाच्या संकटात केंद्रातील सरकारसारख्या थाळ्या राज्य सरकारने वाजविल्या नाहीत, तर प्रामाणिकपणे काम करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले,’’ असा दावा मृदा व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे. (uddhav thackeray did not want to be Chief Minister says shankarrao gadakh)

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नुकताच शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आज (मंगळवारी) दुपारी मृदा व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली.

राज्यमंत्री गडाख म्हणाले, ‘‘इतर राजकीय पक्ष निवडणुका समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडविला. त्यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करीत जनतेला सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला,’’ असे राज्यमंत्री गडाख यांनी सांगितले. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी प्रास्ताविक केले. उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आभार मानले.

हेही वाचा: श्रीगोंद्यात भाजप-काँग्रेस कामाला, राष्ट्रवादीत शांतता!

loading image