esakal | देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला ? अण्णांच्या उपोषणाचं चित्र दुपारनंतर होणार स्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary will meet Anna Hazare at Ralegan Siddhi this afternoon.jpg

सन २०१८ व सन २०१९ च्या आंदोलनातील लेखी आश्वासनांची पुर्तता केंद्र सरकारने अद्याप केली नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला ? अण्णांच्या उपोषणाचं चित्र दुपारनंतर होणार स्पष्ट

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : शेतक-यांच्या प्रश्नांवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उद्या शनिवारी (ता. ३० जानेवारी) येथे सुरू होणार आहेत. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व भाजपच्या नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारचा लेखी मसुदा घेऊन आज दुपारी तीन वाजता राळेगणसिद्धीला हजारे यांच्या भेटीला येणार असून समाधानकारक तोडगा निघतो किंवा न निघाल्यास हजारे उपोषणावर ठाम राहतात का? याकडे देशाचे व राळेगणसिद्धी परिवाराचे लक्ष लागले आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषीमुल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी. या प्रमुख मागण्यांसाठी हजारे उद्या शनिवारी (ता. ३०) जानेवारीपासून येथील संत यादवबाबा मंदिरात उपोषणाला आंदोलन सुरू करणार आहेत. अण्णांच्या मागण्या या शेतकरी हिताच्या आहेत. अण्णांनी या वयात उपोषणाऐवजी मौन वा धरणे आंदोलन करू नये, अशी विनंती राळेगणसिद्धी परिवार व पद्मश्री पोपटराव पवार यांनी केली आहे.

सन २०१८ व सन २०१९ च्या आंदोलनातील लेखी आश्वासनांची पुर्तता केंद्र सरकारने अद्याप केली नसल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे. हजारे उपोषणावर ठाम असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील आदींनी चार ते पाच वेळा राळेगणसिद्धीला येऊन हजारे यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले.

वय पाहता अण्णांनी उपोषण करू नये, यासाठी भाजप नेत्यांनी गेल्या एक महिन्यांपासून राळेगणसिद्धीला वा-या सरू केल्या होत्या. परंतु, दोन वेळा केंद्राने दिलेले लेखी आश्वासन पाळले नसल्याने आता चर्चा नको ठोस कार्यवाही करा, असे सांगत हजारे हे उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

दरम्यान, हजारे यांनी  शेतक-यांच्या प्रश्नी उच्चाधिकार समिती नेमण्याची मागणी केली होती. त्याबाबत गुरूवारी (दि. २७) दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माजी मंत्री महाजन यांनी हजारे यांची भेट घेऊन काल सांगितले होते. या समितीत केंद्र सरकारचे तीन तर हजारे सुचवतील ते तीन सदस्य राहणार आहेत. तसेच माजी कृषीमंत्री सोमपाल शास्त्री व हजारे हे निमंत्रित सल्लागार सदस्य म्हणून राहणार आहेत असे समजते.

मागील दोन आंदोलनात दिलेले लेखी आश्वासन न पाळल्याने फसवणूक झाल्याचा आरोप हजारे यांनी केला होता. त्यामुळे आता शेतक-यांच्या प्रश्नी समाधानकारक तोडगा निघाल्याशिवाय हजारे उपोषणाच्या निर्णयापासून परावृत्त होणार नाहीत अशी परिस्थिती आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी राळेगणसिद्धीत येत आहेत. अण्णांच्या मागण्यासंदर्भातील मसुदा घेऊन येत असल्याने अण्णांचे समाधान होण्याची शक्यता आहे. कदाचित अण्णा उपोषणातून परावृत्त होऊ शकतात. तसे झाल्यास फडणवीस यांची मध्यस्थी फळाला येईल. 

loading image