esakal | (व्हिडीओ) : तेरी मेरी यारी... "गंगी'-"भागी'ची जमलीय गट्टी..
sakal

बोलून बातमी शोधा

A unique friendship between monkey and dog

तालुक्‍यातील खुंटेफळ येथे पाच-सहा वर्षांपूर्वी वानरांचा कळप आला होता. कळपासोबत वानरांची दोन-तीन छोटी पिलेही होती. गावाचा परिसर मोठा. बागायती शेती. फळ-भाजीपाल्याची पिके. त्यामुळे हा कळप या परिसरात चांगलाच रमला. 

(व्हिडीओ) : तेरी मेरी यारी... "गंगी'-"भागी'ची जमलीय गट्टी..

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : "गंगी' आणि "भागी'... एक वानरीण, तर दुसरी कुत्री.. तालुक्‍यातील खुंटेफळ येथील ग्रामस्थांनी त्यांना ही नावे दिलीत.. या दोघींची चांगलीच गट्टी जमली आहे. दिवसभर त्यांच्या लीला पाहताना ग्रामस्थांचे चांगलेच मनोरंजन होते. त्यांच्या मैत्रीची कहाणीही फार मनोरंजक आहे.

हेही वाचा : इंदोरीकर महाराजांना वाढता पाठिंबा.. 

तालुक्‍यातील खुंटेफळ येथे पाच-सहा वर्षांपूर्वी वानरांचा कळप आला होता. कळपासोबत वानरांची दोन-तीन छोटी पिलेही होती. गावाचा परिसर मोठा. बागायती शेती. फळ-भाजीपाल्याची पिके. त्यामुळे हा कळप या परिसरात चांगलाच रमला. 

काही दिवसांनी कळप निघून गेला; पण कळपासोबत चुकामूक झाल्याने वानराचे छोटे पिलू गावातच राहिले. आई दिसेना, मित्रमंडळी गायब झाली. पिलू सैरभैर झाले. आकांत करीत ओरडू लागले. आईचा शोध घेत परिसरात फिरू लागले. 

"भागी'ची पिल्ले मात्र दगावली 

ग्रामस्थांना, लहान मुलांना त्याची दया आली. मोठ्या मायेने त्यांनी त्याला खायला-प्यायला दिले. सुरवातीला माणसांना घाबरून हे पिलू लपून बसत असे. मात्र, हळूहळू त्याची भीड चेपली. माणसांचा, विशेषतः लहान मुलांचा चांगलाच लळा त्याला लागला. गावातील इतर पाळीव प्राणीही त्याच्यासोबत खेळू लागले. काळ लोटला. आता या पिलाचे मादीवानरात रूपांतर झालेय. ग्रामस्थांनी तिला "भागी' असे नाव दिले. तीन-चार पिलांनंतर गावात या "भागी'चाही कुटुंबकबिला तयार झाला होता. मात्र, काही कारणांनी तिची पिले दगावली. 

देव राहत असल्याची भावना 

गावातील लहान-मोठ्या माणसांच्या अंगा-खांद्यावर "भागी' खेळते. कोणी त्रास दिला, तरी उलटून तिने कधी कोणाला इजा केलेली नाही. जणू गावातील एक सदस्य बनूनच ती वावरत असते. तिच्या रूपाने साक्षात देवच गावात राहत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. त्यामुळे तिच्या खाण्याचीही चैन होते. ग्रामस्थ रोज तिला फळे, पोळ्या, भाकरी व इतर अन्नपदार्थ देतात. 

मैत्रीचा नवा अध्याय 

गावातील "गंगी'सोबत म्हणजे कुत्रीसोबत "भागी'ची चांगलीच गट्टी जमलीय. दिवसभर त्यांची एकमेकींशी थट्टामस्करी सुरू असते. त्यांच्यातील कुरापतीच्या मजेदार खेळांनी गावकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होते. "भागी' आणि "गंगी'च्या रूपाने साकार झालेला प्राण्यांतील मैत्रीचा नवा अध्याय खुंटेफळ परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 

खुंटेफळच्या नागरिकच 

भागी व गंगी या दोघींचा गावाला चांगलाच लळा लागला आहे. दिवसभर त्या दिसल्या नाहीत तर ग्रामस्थ बेचैन होतात. दोघींकडे आधार व रेशनकार्ड नाही; बाकी त्या खुंटेफळच्या नागरिकच बनल्या आहेत. 
- गणेश पागर, ग्रामस्थ, खुंटेफळ 

loading image
go to top