कर्जत-जामखेडच्या पोलिसांना रोहित पवारांकडून अनोखे गिफ्ट

वसंत सानप
Friday, 18 December 2020

कर्जत व जामखेडचे पोलिस वेगवान होणार आहेत. रूबाबदार अत्याधुनिक वाहनांचा पोलिस दलाच्या ताफ्यात होणारा समावेश दोन्ही तालुक्यातील पोलिस दलाचा रूबाब वाढवणारा ठरणार आहे.

जामखेड : आमदार रोहित पवारांनी कर्जत व जामखेडच्या पोलिस दलाला अधिक गतिमान करण्यासाठी आधुनिक वाहने भेट दिली. या वाहनांचे गुरुवारी (ता.17) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते व पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून एवढी मोठी भेट पोलिस दलाला प्राप्त होत आहे. आमदार रोहित पवारांनी दिलेली ही भेट राज्यातील अन्य लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधणारी ठरली आहे.

कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमांतून सीएसार फंडातून ही वाहने आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड पोलिस दलाला दिली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आमदार पवारांनी इतरही लोक उपयोगी कामे केली आहेत.

जामखेड व कर्जत या दोन्ही तालुक्यातील पोलिस दलाकडे जुनी वाहने असल्याने पोलिसांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळची गस्त,ग्रामीण भागातील गस्त व आरोपींचा पाठलाग अथवा घटना घडल्या नंतर घटनास्थळी पोहचण्यासाठी लागणारा वेळ, इंधनाचा होणारा अतिरिक्त वापर या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे व सर्व कामे वेळेत पार पाडणे सोईस्कर ठरणार आहे.

हेही वाचा - भाजपच्या नाराज मंडळींना जायचे कोठे असा प्रश्न

कर्जत व जामखेडचे पोलिस वेगवान होणार आहेत. रूबाबदार अत्याधुनिक वाहनांचा पोलिस दलाच्या ताफ्यात होणारा समावेश दोन्ही तालुक्यातील पोलिस दलाचा रूबाब वाढवणारा ठरणार आहे. 

आमदार रोहित पवार राबवित असलेल्या प्रत्येक उपक्रमाची नेहमीच संपूर्ण राज्यात चर्चा होते. यावेळीही या उपक्रमाची आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे रोहित पवारांनी पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. रोहित पवारांनी हाती घेतलेला उपक्रम राज्यातील इतर लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique gift from Rohit Pawar to Karjat-Jamkhed police