
तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जमाघारीपर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला.
पारनेर ः तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यांपैकी नऊ बिनविरोध झाल्या, तसेच 189 सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. मात्र, यात बिनविरोधसाठी अनेक युक्त्यांचा वापर करावा लागला.
काही ठिकाणी गावाला देणगी देऊन, काही ठिकाणी समोरच्या उमेदवाराने माघार घेण्यासाठी त्याचा खिसा भरून, तर काही ठिकाणी दमबाजी करून निवडणुका बिनविरोध झाल्याचे किस्से आता ऐकावयास मिळत आहेत.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर अर्जमाघारीपर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर केला. त्यात काहींनी समोरच्या विरोधी उमेदवारास विनंती करून किंवा त्याचा झालेला खर्च देऊन व वेळ पडली तर काही ठिकाणी थोडा-फार धाकदपटशा करून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले गेले.
काही ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांनी गावासाठी किंवा मंदिरासाठी देणगी स्वरूपात निधी द्यावा, असे ठरले व तो निधी त्यांनी ग्रामस्थांकडे जमाही केला आहे.
अर्जमाघारीची मुदत संपल्यानंतरही, आपल्या विरोधातील उमेदवार अपक्ष असेल तर त्यास विनंती करून पाठिंबा देण्यास सांगितले जात आहे. मात्र, बिनविरोधसाठी झालेला खटाटोप अनेकांना आता खटकू लागला आहे.