टॅगिग नसलेल्या जनावरांना यापुढे बाजार समितीत खरेदी विक्रीसाठी बंदी

आनंद गायकवाड
Friday, 4 September 2020

मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय व पशुधन असलेल्या संगमनेर तालुक्यातील पशुधनासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पंचायत समितीच्या वतीने संसर्गजन्य लाळ्या, खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम सुरु केली.

संगमनेर (अहमदनगर) : मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय व पशुधन असलेल्या संगमनेर तालुक्यातील पशुधनासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पंचायत समितीच्या वतीने संसर्गजन्य लाळ्या, खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम सुरु केली असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी तालुका स्तरावरील बैठकीत दिली.

पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, डॉ. जे. के. थिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम. पोखरकर, डॉ. नितीन जोंधळे, डॉ. सुनील शिदोरे, डॉ. वर्षा शिंदे, डॉ. रवींद्र घोडके उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत सर्व पशुपालक शेतकर्‍यांनी जनावरांना टॅगिंग व लसीकरण करून घ्यावे. सर्व पशुवैद्यकांनी गाव पातळीवरील ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांच्या सहकार्याने योजनेची व्यापक प्रचार, प्रसिद्धी करावी. जनावरांना टॅग मारल्यानंतर काही पशुपालक ते काढून काढतात. या तक्रारीनंतर अशा जनावरांना बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीसाठी बंदी घालण्यात येईल, तसेच पशुप्रदर्शन व कर्ज प्रकरणातून ही जनावरे वगळण्यात येतील. अशा शेतकर्‍यांना इतरही योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ यांनी संगमनेर तालुका पशुधन लसीकरणात राज्यात मॉडेल ठरण्यासाठी राजहंस दूध संघ तसेच गाव पातळीवरील दूध संस्थांचे चेअरमन, सचिव, पशू सुधार समिती यांना विश्वासात घेऊन योजना राबवण्याची सूचना केली.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यात एक लाख 67 हजार 900 पशुधन आहे. तालुक्यातील 24 पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत 1 सप्टेंबरपासून लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण सुरु केले आहे. तालुक्यातील सर्व जनावरांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक जनावराच्या कानात टॅग मारून ते शासनाच्या अधिकृत प्रणालीवर ऑनलाइन करूनच लसिकरण करण्यातयेणार आहे.

संगमनेर तालुक्यात 1 लाख 92 हजार 202 एवढे गाय व म्हैस वर्गाचे पशुधन असून 24 पशुवैद्यकीय संस्थांमार्फत लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. ही 1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबविण्यात येणार असून, लसीकरण जनावरे व ऑनलाईन नोंदणी यासाठी शासनाकडून खाजगी पशुवैद्यकांना मानधन देण्यात येणार आहे. गाव पातळीवरील इच्छुक खाजगी पशुवैद्यकांचे अर्ज स्वीकारण्याचे काम स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यात सुरु असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. पी. एम पोखरकर यांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccination campaign for control of animal diseases in Sangamner taluka