वळण येथे ग्रामस्थांनी एकजूट करून अवैध दारू विक्री बंद करण्याचा निर्णय

विलास कुलकर्णी
Sunday, 27 September 2020

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. तालुक्यात अवैध धंदे तिप्पट-चौपट वाढले. वळण येथे मागील सहा महिन्यांपासून अवैध दारू विक्री जोमाने सुरू झाली.

राहुरी (नगर) : राज्यमंत्र्यांच्या आदेशाला पोलिसांकडून केराची टोपली; वळण येथे पुन्हा अवैध दारू विक्री सुरू. या मथळ्याखाली ई-सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध होताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. काही तरुणांनी थेट मुळा नदीकाठी दारू अड्ड्यावर हल्लाबोल केला. दारूविक्री करणाऱ्यांनी पळ काढला. एक दारू विक्रेता तरुणांच्या तावडीत सापडला. त्याला बेदम चोप बसला. दारूच्या बाटल्या, हातभट्टीच्या रसायनांचे ड्रम, दारू विक्रेत्यांची वाहने यांची तरुणांनी तोडफोड केली.
  
वळण येथे ग्रामस्थांनी एकजूट करून अवैध दारू विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वळण येथे जनता दरबारात दारूबंदीला पाठींबा दिला. पोलिस खात्याला दारुबंदी करण्याचे आदेश दिले. तसे त्यांनी जनता दरबारात जाहीर केले. तीन महिने दारूबंदी झाली. नंतर, कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. तालुक्यात अवैध धंदे तिप्पट-चौपट वाढले. वळण येथे मागील सहा महिन्यांपासून अवैध दारू विक्री जोमाने सुरू झाली. वळण येथील दारू विक्रेता पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या गळ्यातील ताईत बनला. पोलिस खात्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत. अशी दमबाजी करून, ग्रामस्थांवर तो शिरजोर झाला.
  
ई-सकाळ' मध्ये बातमी प्रसिद्ध होताच दारूविक्रेत्याच्या समाजातील काही तरुणांनी पुढाकार घेतला. समाजाची बदनामी होत आहे. अवैध दारू विक्री बंद कर. असा दारू अड्ड्यावर जाऊन सज्जड दम भरला. परंतु, मुजोर दारू विक्रेत्याने पोलीस खात्याच्या पाठबळामुळे आलेल्या तरुणांवर अरेरावी सुरू केली. तरुणांनी रागाच्या भरात तोडफोड सुरू करताच काही दारू विक्रेत्यांनी पळ काढला. मुजोर दारू विक्रेत्याला तरुणांनी बेदम चोप दिला.

दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक नीरज बोकिल यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी दारू विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या तरुणांची नावे विचारली. परंतु, घाबरलेल्या दारू विक्रेत्याने आमचे आपापसात भांडण झाले. मला तक्रार करायची नाही. असे सांगून पोलीस पथकाला माघारी धाडले.

राहुरी येथील पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील म्हणाले, वळण येथे घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. आपापसात भांडण झाल्याचे समजले. कुणीही तक्रार केली नाही. भांडण मिटले आहे. त्यामुळे, कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. 

संपादन -सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: At the valan the villagers united and decided to stop selling illegal liquor