व्यापारीवर्ग बसतो जीव मुठीत धरून; महामार्गावरील बाजार हलविण्याची गरज

केशव चेमटे
Wednesday, 23 September 2020

गावातून नगरकडे जाणारी वाहने महामार्गाला लागण्यासाठी या चौकात येतात, मात्र व्यापा-यांच्या दुकानांमुळे महामार्गावरील वाहने दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात अथवा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.

भाळवणी (अहमदनगर) : येथील भाजी व फळ विक्रेते यांना बाजारतळावर बसण्यास ग्रामपंचायतीने कोरोनामुळे मज्जाव केल्याने त्यांनी नगर कल्याण महामार्गावर एस.के.चौकात दुकाने थाटली आहेत. हा भाग वळणावर असून महामार्गावरून जाणारी वाहने अतिशय वेगाने जात असल्याने एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढला आहे. यामुळे गावातील बाजारतळावर भाजी व फळ विक्रेते यांना दुकाने थाटण्याची ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही. सदर व्यापाऱ्यांनी नगर कल्याण महामार्गावर गावाच्या बाहेर कापरी नदीवरील जुन्या पुलावर जागा दिली आहे. मात्र ही जागा व्यवसायाच्या दृष्टीने योग्य नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात काही दिवस जुन्या पुलावर दुकाने मांडली होती. तिथे ग्राहक येत नसल्याने व्यापाऱ्यांनी सर्वानुमते विचार करून महामार्गावरील एस.के.चौकात दुकाने थाटली. या चौकात वळण असून कोणतेही गतीरोधक नसल्याने ये-जा करणारी वाहने अतिशय वेगाने जात असतात.

गावातून नगरकडे जाणारी वाहने महामार्गाला लागण्यासाठी या चौकात येतात, मात्र व्यापा-यांच्या दुकानांमुळे महामार्गावरील वाहने दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात अथवा दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. या चौकातील विक्रेत्यांना गावात योग्य ठिकाणी जागा देवून येथील बाजार बंद करण्याची मागणी होत आहे.
 
फळ विक्रेते गंगाधर रोहोकले म्हणाले, जुन्या पुलावरील जागा विक्रेते व व्यापारी यांच्या दृष्टीने योग्य नाही. बाजारतळावर उपहारगृहे, चहा, पानटपरी, किराना दुकान आदी जोरात सुरु आहेत. या ठिकाणी परिसरातून आलेल्या ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे कोरोना पसरणार नाही, याची शाश्वती कोण देणार. बाजार तळावर ओटे आहेत. या ओट्यामध्ये मोठे अंतर आहे, या ओट्यावर भाजीपाला दुकाने लावण्याची परवानगी दिली पाहिजे.

उपसरपंच संदीप ठुबे म्हणाले, भाजी व फळ विक्रेते यांना जुन्या पुलावर जागा दिली होती. परंतु व्यापारी येथे बसण्यास तयार नाहीत. चौकात बसणा-या    व्यापा-यांना तिथे बसू नये, याबाबत ग्रामपंचायतीने सांगितले आहे. मात्र या जागेचा व ग्रामपंचायतीला काहीही संबध नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.
 

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable and fruit vendors in Bhalwani are frightened by the traffic on the highway