संगमनेर तालुक्यात वाळू चोराची वाहने पकडली पण आरोपी फरार

आनंद गायकवाड
Sunday, 4 October 2020

उंबरी बाळापूर शिवारातील प्रवरा नदीपात्रातून वाळूचोरी करणाऱ्या दोन वाहनांसह, एक ब्रास वाळू असा चार लाख 10 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेवून, वाहनांचे चालक पसार झाल्याची घटना आज पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील उंबरी बाळापूर शिवारातील प्रवरा नदीपात्रातून वाळूचोरी करणाऱ्या दोन वाहनांसह, एक ब्रास वाळू असा चार लाख 10 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मात्र, अंधाराचा फायदा घेवून, वाहनांचे चालक पसार झाल्याची घटना आज पहाटे अडीचच्या सुमारास घडली. 

नगरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी सचिन दत्तात्रेय अडबल यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या आदेशाने, फरार गुन्हेगारांचा आश्वी परिसरात शोध घेत असताना गुप्त खबऱ्यामार्फत उंबरी शिवारातील प्रवरापात्रात मजिरांच्या मदतीने सुरु वाळू उपसा सुरू आहे.

खात्री पटल्याने आश्वी पोलिसांच्या मदतीने पहाटे अडीचच्या सुमारास नदीपात्रात छापा टाकला. मात्र चाहुल लागल्याने आरोपी पसार झाले. नदीपात्रातून (एम. एच. 14 व्ही. 9424 ) व एक विनाक्रमांकाचे अशी दोन झेन चारचाकी वाहने त्यातील प्रत्येकी अर्धा ब्रास वाळूसह ताब्यात घेतली. याबाबत चौकशी करताना क्रमांक असलेले वाहन अशोक शेळके, (रा, उंबरीबाळापूर, ता. संगमनेर) यांच्या तर विनाक्रमांकाचे वाहन गणेश साहेबराव मदने (रा. आश्वी बुद्रूक, ता. संगमनेर) यांच्या मालकीचे असल्याचे समजले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicles of sand thieves caught in Sangamner taluka but accused absconding