esakal | तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर (Veteran Tamasha artist Kantabai Satarkar) यांचे आज सायंकाळी साडे पाच वाजता निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे अलका, अनिता, मंदा या तीन मुली तर रघुवीर खेडकर (Raghuveer Khedkar) हे मुलगे आहेत. त्यांची मुले-मुली, जावई आणि नातवंडे तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. मूळ सातारच्या असलेल्या कांताबाई संगमनेर शहरात स्थायिक झाल्या होत्या. त्यांचा विवाह तुकाराम खेडकर यांच्यासोबत झाला होता. (Veteran Tamasha artist Kantabai Satarkar, mother of Tamasha artist Raghuveer Khedkar passed away)

त्यांचे चिरंजीव रघुवीर खेडकर हे तमाशा फडमालक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आहेत. रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर हा तमाशा राज्यात प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा काळ असल्याने गावोगावच्या जत्रा होत नाहीत. परिणामी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याबाबत सरकारने मदत केली पाहिजे, याबाबत मायलेक भूमिका मांडत.

सातारकर यांनी वयाच्या नवव्या वर्षी तमाशात पदार्पण केलं. तुकाराम खेडकर यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी अनेक वगनाट्य केली. नृत्य ही त्यांची खासियत होती. वगनाट्यातील राजकीय, राजकीय, धार्मिक भूमिका गाजल्या. सन २००५मध्ये विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाचा राज्य सरकारचा पहिला जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलं होतं. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची लोककला हा तमाशा सादर करण्याचा त्यांना मान मिळाला होता.

महिला रसिक

तमाशाला पुरूष मंडळी जातात, अशी मानसिकता आहे. परंतु कांताबाईंच्या कलेमुळे त्यांच्या तमाशाला महिलाही तिकीट काढून येत. एकंदरीत त्यांनी महाराष्ट्राची लोककला जपण्याचे काम केले. त्यांच्या जीवनावर संतोष खेडलेकर यांनी पुस्तक लिहून त्यांचा जीवनपट मांडला आहे.

खेडकर यांच्याशी लव्ह मॅरेज

पोवाडा गायनात त्यांचा विशेष नावलौकिक होता. फडमालक स्व.तुकाराम खेडकर यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. सन १९७० च्या सुमारास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कला भूषण मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर या नावाने तमाशा फड सुरू केला. राज्यातील आघाडीच्या फडात या तमाशाची गणना होते.

वयाच्या ७० वर्षांपर्यंत त्या त्यांच्या तमाशात काम करीत होत्या. तमाशाच्या माध्यमातून त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, लोक शिक्षणातून लोक जागृती केली.

गाजलेली वगनाट्य

कोंढण्यावर स्वारी, विशाळगडची राणी, रायगडची राणी, पाच तोफांची सलामी, क्रांतिसिंह नाना पाटील ही ऐतिहासिक वगनाट्य व कोर्टाच्या दारी फुटला चुडा, का माणूस झाला सैतान, असे पुढारी आमचे वैरी ही समाजिक वगनाट्य विशेष गाजली. कोंढण्यावर स्वारी या वगनाट्यात त्यांनी साकारलेली जिजामातेची भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहिली. या भूमिकेबद्दल माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना सन्मानित केले होते.

वगनाट्यात दुहेरी भूमिका

कांताबाई नृत्य, अभिनय, गायनात पारंगत होत्या. एकाच वगनाट्यात त्या पुरुष व स्त्री भूमिका साकारीत. लोककलेची महाराणी म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनामुळे तमाशा पोरका झाला आहे, अशी भावना अखिल भारतीय तमाशा परिषदेचे संभाजी जाधव यांनी "ई सकाळ"सोबत बोलताना व्यक्त केली.