विद्याचा विद्येसाठीचा प्रेरणादायी प्रवास : शिक्षणासाठी केली नोकरी, आता शिक्षणाने केले अधिकारी

Vidya Ughade from Ahmednagar has overcome adversity and achieved success in the post of Agriculture Finance Officer
Vidya Ughade from Ahmednagar has overcome adversity and achieved success in the post of Agriculture Finance Officer

अहमदनगर : सुरवातीपासून प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतंच. आयुष्यात त्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी अनेक जण शेवटपर्यंत प्रयत्न करतात. जेव्हा हे प्रयत्न यशस्वी ठरतात तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आयुष्यात काही तरी करायचं ही खूणगाठ मनाशी बांधली की सारं काही शक्य होऊन जातं. याच निर्धारानं विद्या यशाच्या मार्गाकडे वाटचाल करत राहिली. इच्छाशक्ती, ध्येयनिश्‍चिती, अपार कष्ट करण्याची तयारी आणि विचारांची दूरदृष्टी असेल तर अशक्य असं काहीही नसतं. त्याच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्याने 'कृषी वित्त अधिकारी' या पदावर भरारी घेतली आहे. 

विद्या उघडे ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या दिग्रस या गावातील असून ती सध्या २८ वर्षाची आहे. तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. तर बी.एस.सी नागपूरच्या सरकारी महाविद्यालयात आणि एम. एस.सी अकोल्यामध्ये झाले आहे. पुढे जाऊन मोठे व्हायचं या उद्देशाने विद्याने शिक्षण घेण्यासाठी कुटुंबापासून लांब राहिली.

घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे तिला शिक्षणासाठी बाहेरगावीच राहावे लागले. राहुरीमध्ये प्रत्येक घरात अधिकारी आहेत ते पाहून आपणही अधिकारी बनायचं त्याच जिद्दीवर ती आज 'कृषी वित्त अधिकारी' बनली असून पारनेर येथे कार्यरत आहे. नोकरी लागून तीन वर्ष झाले आहे. तिच्या घरात आई वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. घरात दोन एकर कोरडवाहू शेती असून तिचे आई वडील शेतीच करतात. 

घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे पार्ट टाईम नोकरी करीत तिने शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी नातेवाईक तिच्या आई वडिलांना बोलत होते की, मुलीला बाहेरगावी शिक्षणासाठी कशाला पाठवताय, तिला शिकवू नका, लग्न लावून तिला दिल्या घरी पाठवा. तरीही तिने मनाचा निश्चय करून शिक्षणासाठी परगावी राहण्यास तयार झाली. त्यावेळी तिच्या मोठ्या भावाने बारावी करून स्वतःचे शिक्षण बंद केलं आणि सलग पाच वर्षे दूध व्यवसाय करून तिला शिक्षणासाठी पैसे पुरवत राहिला.

विद्याने २०१५ ला पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर नातेवाईकांनी तिच्या विवाहासाठी मागे लागले होते. पण तिने तिचा अभ्यास सुरूच ठेवून २०१५ ला फॉरेस्ट एमपीएससी मुख्य परीक्षा दिली पण अयशस्वी झाली. तरीही न खचता अभ्यासात सातत्य ठेवून ती २०१६ ला आयबीपीएसच्या मुलाखतीपर्यंत गेली. त्यावेळी ही ती अयशस्वी झाली. त्यानंतर मनात जिद्द ठेवून २०१७ ला आयबीपीएसच्या परीक्षेचा सखोल अभ्यास करून 'कृषी वित्त अधिकारी' हे यश संपादन केलं. त्यावेळी तिच्या  कुटूंबातील लोकांना खूप आनंद झाला. 

घरातील पहिली मुलगी सरकारी नोकरदार बनली यामुळे नातेवाईकही खूप आनंदित झाले. त्यानंतर तिने तिच्या आईवडिलांना आणि घरामध्ये मदत केली. नोकरीनंतर त्यांच्या शेतात १० गाई खरेदी केल्या. मोठ्या भावाचा विवाह लावून दिला. विद्याने २०१९ ला स्वतःच्या लग्नाचा खर्च स्वतः केला. परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकवते. संघर्षातून धैर्याने पुढे जाताना जीवनाचे अनेक स्थित्यंतर घडतात. अशाच परिस्थितीत जिद्दीने व प्रामाणिकपणे कठोर अभ्यास केल्यास यश हमखास मिळते हे विद्याने दाखवून दिले.

घरचा पाठिंबा असेल तर कोणालाही यश संपादन करता येते, हेच यशाचं गणित आहे. मात्र या आव्हानास दोन हात करत विद्याने अतोनात कष्ट उपसत थक्क करणारा प्रवास केला आहे. तमाम लोकांसाठी ही बाब प्रेरणादायक आहे. उत्‍पन्‍नाचे साधन नसल्‍याने सुरुवातीच्‍या काळात विद्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. हाच त्यांच्या आयुष्याला योग्य वळण देणारा ठरला आहे. 

मागील काही वर्षांपासून अतिशय कष्‍टपूर्वक सुरू होणारी तिची दिनचर्या थक्क करणारी. हेच तिच्या यशस्वितेचे गमक आहे. यामुळेच तीने जिद्द, चिकाटी व मेहनतीने प्रतिकूल परिस्थितीमध्‍येही आश्‍चर्यकारक प्रगती घडवून आपला विकास साधून एक आदर्श निर्माण केला आहे. अथक परिश्रमाने विद्याने स्‍वतःचे एक विश्‍व निर्माण केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करुन आपण चांगल्याप्रकारे स्वावलंबी होवू शकतो हा दांडगा विश्वास विद्यामध्ये दिसून येतोय. पुढे जाऊन तिला फॉरेस्ट ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. 

कृषी वित्त अधिकारी विद्या उघडे खटके म्हणाल्या, पुढील पिढीने चांगले शिक्षण घेऊन नोकरीच्या दृष्टीने आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली पाहिजे. कष्ट करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. मनात इच्छा ठरवली तर यश नक्कीच मिळते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com