विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने घेतले १२ ऊस तोडण्याच्या मशिन

प्रा. रवींद्र काकडे
Wednesday, 23 September 2020

आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणीसाठी लागणारा विलंब कमी व्हावा यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा सहकारी बॅंकेच्या सहकार्याने १२ केन हार्वेस्टर मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत.

लोणी (अहमदनगर) : आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस तोडणीसाठी लागणारा विलंब कमी व्हावा यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा सहकारी बॅंकेच्या सहकार्याने १२ केन हार्वेस्टर मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत. विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर पहील्या केन हार्वेस्टर मशिनची विधीवत पूजा करण्यात आली. 

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वासराव कडू, ट्रक वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदूकिशोर राठी, प्रवरा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, संचालक अशोक आहेर, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक पानगव्हाणे, कामगार संचालक पोपट वाणी, दिलीप कडू, एस बी गायकवाड, सरोज परजणे, व्यवस्थापक जालिंदर खर्डे उपस्थित होते.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पाटील कारखान्याने केन हार्वेस्टर मशिन घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकरी अथवा कंत्राटदारांना आ. राधाकृष्ण विखे पाटील ट्रक्स वाहतूक सोसायटीच्या पुढाकाराने प्रोत्साहनपर योजना तयार करण्यात आली होती.

याद्वारे एकूण बारा इच्छुक व्यक्तिंनी केन हार्वेस्टर मशीन प्रवरा सहकारी बँकेच्या सहकार्याने खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. यापैकी पहीले केन हार्वेस्टर मशिन बाबासाहेब बोरसे यांच्याकडे कंपनीने सुपूर्त केले असल्याचे ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदकिशोर राठी यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe Patil Cooperative Sugar Factory took 12 cane cutting machines