"साकळाई"चा प्रश्न विखे पाटलांनी थेट लोकसभेत नेला, अंमलबजावणीसाठी सूचवला उपाय

Vikhe Patil demanded Rs 500 crore from NABARD for "Saklai" scheme
Vikhe Patil demanded Rs 500 crore from NABARD for "Saklai" scheme

अहमदनगर ः सकाळी योजना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटलांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. केवळ निवडणूक आली की त्या योजनेविषयी चर्चा व्हायची. परंतु खासदारांनी आता या योजनेत स्वतः लक्ष घातले आहे.

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील बत्तीस गावांसाठी  मृगजळ ठरलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी वांबोरी चारीच्या मॉडेलप्रमाणे नाबार्ड अंतर्गत  पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊन ही योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज लोकसभेत केली.

यासाठी केंद्र सरकारने जल  शक्ती मंत्रालयामार्फत सहाय्य करावे अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी लोकसभेत केली.

जनहिताच्या विशेष मुद्यांसाठी राखीव असणाऱ्या लोकसभेचा वेळेचा उपयोग विखे पाटील यांनी खुबीने करून घेतला आहे . यावेळी बोलताना खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की, नगर व श्रीगोंदा तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांसाठी साकळाई जलसिंचन उपसा योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही.

गेल्या तीस-चाळीस वर्षापासून या भागातील शेतकरी या योजनेसाठी संघर्ष करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची तरतूद देखील केली होती. मात्र, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. नूतन आघाडीचे सरकार या योजनेकडे तितकेसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंतदेखील खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली .

लोकहितासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेली ही योजना निधीअभावी व राज्य सरकारच्या  उदासीनतेमुळे अडकू नये त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर विखे पाटील यांनी केली.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये यापूर्वी स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी यापूर्वी नाबार्डच्या अर्थसहाय्यातून वांबोरी चारी उभी केली होती. त्यामुळे धरणाच्या उशाशी असूनदेखील पाण्यापासून वंचित असणाऱ्या  गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सोय झाली आहे. याच योजनेला अनुसरून साकळाई जलसिंचन उपसा योजनेला केंद्र सरकारमार्फत नाबार्ड अंतर्गत जर अर्थसाहाय्य मिळाले तर दशकांपासून संघर्ष करणाऱ्या 32 गावातील शेतकऱ्यांना  न्याय मिळेल, असा विश्वास विखे पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त  केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com