Vikhe Patil reveals about Minister Thorat,
Vikhe Patil reveals about Minister Thorat,

विखे पाटलांनी केला मंत्री थोरातांविषयी गौप्यस्फोट, उभे केले हे प्रश्नचिन्ह

Published on

नगर ः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील राजकीय भाऊबंदकी सध्या उफाळली आहे. एकमेकांवर जिव्हारी लागणाऱ्या भाषेत टीका केली जात आहे. शालजोडीतून मारताना एकमेकांचा पाणउताराही केला जात आहे. मंत्री थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना विखे पाटील यांनी काही गौप्यस्फोट करीत त्यांच्या महसूलमंत्रीपदाच्या कार्यकाळातील निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

मी पक्ष सोडल्यानेच त्यांना पदे मिळाले

नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्‍यक्षांना मोतोश्रीच्या दारात जावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्थान आहे. याबद्दल न बोललेच बरे, मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले. आता मंत्रीपद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड आहे. कोण कोणाच्या पाया पडतो, हे पाहणारे आ.थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात थांबून काय करत होते? भ्रष्टाचाराच्या फाईल काढू नयेत म्हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजपमध्ये घ्या म्हणून विनवणी करत होते, यावरही त्‍यांनी बोलले पाहिजे, असे आव्हान माजीमंत्री आ.विखे पाटील यांनी दिले.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा आ.विखे पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. लोणी येथे माध्‍यमांशी बोलताना त्यांनी समाचार घेतला. 

यांचे कर्तृत्वच आहे तरी काय

आ.विखे पाटील म्‍हणाले की, प्रदेशाध्‍यक्षांच्‍या वक्‍तव्‍याला फारसे गांभीर्याने घ्‍यावे अशी परिस्थिती नाही. त्यांच्या नेतृत्त्वात कॉंग्रेस पक्षाची कशी वाताहत झाली हे महाराष्ट्र पाहतोय. त्यांचे स्वतःचे कर्तृत्‍व काहीच नाही. यापूर्वी राज्‍यात अशी परिस्थिती कधीही नव्हती. सत्तेत सहभाग असलेल्या राष्‍ट्रीय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला आठ-आठ दिवस मुख्‍यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत हेच मोठे दुर्दैव असल्‍याकडे लक्ष वेधून येवढी लाचारी पत्‍करुन सत्‍तेत का राहाता? सत्तेत राहू यासाठीच आता मातोश्रीवर वा-या सुरु अाहेत. 

भ्रष्टाचाराच्या फाईल काढू नये म्हणून गप्प बसले

शेत‍करी, उद्योजक, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या प्रश्‍नांसाठी मुख्‍यमंत्र्यांकडे गेले असते तर सर्वांना आनंद वाटला असता. पण सत्तेत आम्‍हाला ‘घाटा नको वाटा पाहिजे’ ही स्वार्थी भूमिका घेवूनच मातोश्रीवरच्या बैठकीचा त्यांचा फार्स होता, हे आता लपून राहिलेले नाही. मागील पाच वर्षे त्‍यांना सभागृहात बोलण्‍यासही वेळ नव्हता. त्यांच्या मंत्रीपदाच्या  कार्यकाळातील कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. भ्रष्टाचाराच्या फाईल बाहेर येवू नयेत यासाठीच ते मागील युती सरकारच्‍या विरोधात शब्दही काढण्याची हिम्मत दाखवु शकले नसल्‍याचा थेट आरोप आ.विखे पाटील यांनी केला.

थोरातांच्या बंगल्यावर अधिकारी काय करतात..
हे महसूलमंत्री मंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्त आधिकारी पुन्हा थोरातांच्या कार्यालयात कसे दिसतात? त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. मागील पाच वर्षे हे आधिकारी घरी बसले होते. आता पुन्हा मंत्री झाल्‍यानंतर हेच आधिकारी थोरातांच्या कार्यालयात मागे बसून काय करतात. प्रशासनात चांगले आधिकारी नाहीत का? स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या अधिका-यांना पुन्हा घेण्याचे गौडबंगाल काय, हे एकदा राज्याला कळू द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com