शिर्डी मतदारसंघात गावनिहाय विकासप्रक्रिया सुरू 

आनंद गायकवाड
Monday, 2 November 2020

कोविडच्या काळात आरोग्य सुविधांसाठी मोठा सामना करावा लागला. यादरम्यान आरोग्य केंद्रांतील त्रुटी लक्षात आल्या.

संगमनेर (अहमदनगर) : कोविडच्या काळात आरोग्य सुविधांसाठी मोठा सामना करावा लागला. यादरम्यान आरोग्य केंद्रांतील त्रुटी लक्षात आल्या. नव्याने होणारी आरोग्य केंद्रे सर्व सुविधांनी युक्त व परिपूर्ण असावीत. शिर्डी मतदारसंघात गावनिहाय विकासाची प्रक्रिया सुरू आहे. मागणीप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. 

तालुक्‍यातील सादतपूर येथे सुमारे 75 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात आपणा सर्वांना आरोग्याचे महत्त्व समजले, तसेच उपलब्ध आरोग्य सुविधांवर आलेला ताणही आपण सर्वांनी अनुभवला. कोणत्याही संकटात काही तरी शिकायला मिळते.

कोविडमुळे आरोग्य सुविधेतील त्रुटी दूर करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळेच नव्याने उभारण्यात येणारी आरोग्य केंद्रे परिपूर्ण असावीत, यासाठी शासनाने अधिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पायाभूत सुविधांतून विकास साध्य करून गावपण टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. 

या वेळी भास्कर दिघे, कैलास तांबे, भगवान इलग, संतोष रोहोम, मच्छिंद्र थेटे, पंचायत समिती सदस्य दीपाली डेंगळे, उपअभियंता प्रताप जाधव, आरोग्य अधिकारी तय्यब तांबोळी आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village wise development process started in Shirdi constituency