नाथनगरच्या ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने लोकसहभागातून तयार केला लोखंडी पूल

सचिन सातपुते
Tuesday, 29 September 2020

नाथनगर ही हसनापूर ग्रामपंचायती अंतर्गत येणारी ९०० लोकसंख्येची वस्ती आहे. येथील नागरीकांचा दैनंदिन गरजासाठी हसनापूरशी संपर्क असतो. हे अंतर तीन कि.मी असून त्यामध्ये ओढे नाले व पांदी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्यावर चिखलाचे साम्राज्य असते.

शेवगाव (नगर): तालुक्यातील हसनापूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणा-या नाथनगर येथील ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने पावसाळयात त्यांचे आतोनात हाल होत आहेत. दैनंदिन गरजांसाठी रस्त्यातील ओढे नाले पार करत चिखल तुडवावा लागत असल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून लोखंडी पूल तयार करत तात्पुरता पर्याय शोधला आहे.  

नाथनगर ही हसनापूर ग्रामपंचायती अंतर्गत येणारी ९०० लोकसंख्येची वस्ती आहे. येथील नागरीकांचा दैनंदिन गरजासाठी हसनापूरशी संपर्क असतो. हे अंतर तीन कि.मी असून त्यामध्ये ओढे नाले व पांदी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. यावर्षी जून पासून सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यातील ओढे नाले वाहत असून संपूर्ण रस्ता चिखलाने माखला आहे. त्यामुळे दुचाकी व कुठलेच वाहन त्यावरुन जाण्याचे तर सोडाच साधे पायी चालणे ही कठीण झाले आहे. रात्री अपरात्री आजारी रुग्णांना याच रस्त्याने न्यावे लागत असल्याने अनेकदा उपचारा अभावी व्यक्ती दगावण्याचा धोका निर्माण झालेला आहे.

शाळेतील विदयार्थी माध्यमिक शिक्षणासाठी वस्तीवरुन हसानापूर येथे येजा करतात. मात्र त्यांना ही तीन किमी अंतर चिखल तुडवत यावे लागते. येथे येण्यासाठी राक्षी, ठाकुर निमगाव व सोनेसांगवी या तीन ठिकाणाहून ही वेगवेगळे रस्ते आहेत. मात्र त्यांचे अंतर पाच सहा किमी असल्याने ग्रामस्थांचा हसनापूरशी जास्त संपर्क येतो. 

अनेक वर्षापासून रस्त्यावाचून होणारी ही परवड सहन करत येथील रहिवाशांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व विविध विभागाकडे निवेदने दिली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यावर्षी जून महिन्यापासून रस्त्यातील ओढयात पाणी जास्त असल्याने त्यातून ये जा करण्यासाठी मोठा धोका असल्याने स्थानिक तरुणांनी उपाय शोधत येथील वैदयकीय व्यावसायिक अभिजीत ढाकणे यांच्या सहकार्यातून ओढयावरील लांबी येवढा लोखंडी जाळीचा छोटेखानी पुल तयार करुन घेतला. त्यासाठीचा आलेला खर्च ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमा केला. ओढयावर पूल तयार झाल्याने दुचाकीवरुन व पायी ये जा करणा-या नागरीकांना तात्पूरता दिलासा मिळाला आहे. मात्र उर्वरीत रस्ता कच्चा असल्याने नागरीकांची परवड काही थांबत नाही. वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता मिळावा यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसिलदार अर्चना भाकड यांना निवेदन दिले आहे. 

नाथनगरचे ग्रामस्थ सुधाकर ढाकणे म्हणाले, वर्षानुवर्ष पक्क्या रस्ताअभावी आमची परवड सुरु आहे. यावर्षी संततधार पावसामुळे त्यात अधिक भर पडली आहे. रात्री अपरात्री आजारी रुग्णांना नेण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण निर्माण होते. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष दयावे.  

संपादन - सुस्मिता वडतिले 
                                                                                                                


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The villagers of Nathnagar have built an iron bridge through public participation as there is no road available for them to come and go