श्रीगोंद्यात शिक्षकांचाच जमाव, लेखापरीक्षणासाठी उसळली गर्दी

संजय आ. काटे
Saturday, 12 September 2020

तालुक्‍यातील शाळांनी सर्व शिक्षा अभियात आलेल्या निधीचे कसे नियोजन केले, यासह इतर बाबींचे वार्षिक लेखापरिक्षण काल (शुक्रवारी) झाले. 146 शाळांना त्यासाठी आमंत्रित केले होते.

श्रीगोंदे : शाळेचे ऑडिट करण्यासाठी शहरातील एकाच ठिकाणी शिक्षकांना बोलाविण्यात आले.शंभरावर शाळा व 300च्या आसपास शिक्षकांची त्यासाठी गर्दी झाली. कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्स पाळा, हे सांगण्याची वेळ शिक्षकांसाठीही आली. मात्र, असे एकत्र व आताच लेखापरिक्षणाची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित झाला. 

तालुक्‍यातील शाळांनी सर्व शिक्षा अभियात आलेल्या निधीचे कसे नियोजन केले, यासह इतर बाबींचे वार्षिक लेखापरिक्षण काल (शुक्रवारी) झाले. 146 शाळांना त्यासाठी आमंत्रित केले होते. त्यापैकी काहींची गैरहजेरी असली, तरी शंभरांवर शाळा व त्यांतील सुमारे 300 प्रतिनिधी उपस्थित होते. शहरातील महादजी शिंदे महाविद्यालयात हे परीक्षण करण्यात आले. 

मूळात प्रत्येक शाळांचे लेखापरिक्षण त्या त्या शाळांमध्ये करणे आवश्‍यक होते. मात्र, शिक्षकांना एकाच वेळी बोलावल्याने शहरात एकच गर्दी झाली. प्रशासनानेच जमावबंदीचा नियम तोडला. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी गुरुजींना वेगवेगळ्या वर्गात बसविले. मात्र, तेथेही गर्दी झाल्याचे समोर आले.

शिवाय कोरोनाचे आगार असलेल्या मुंबईतून हे लेखापरिक्षक आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोरोनाच्या संकटात लेखापरिक्षण करुन प्रशासनाने नेमके काय साधले, हे समजले नाही. याबद्दल अनेक गुरुजींनी कानावर हात ठेवत माहिती नसल्याचे दाखविले. 

दरम्यान, समजलेल्या माहितीनूसार शिक्षक संघटनांनी कोरोनात असे एकत्र लेखापरिक्षण नको, अशी भूमिका घेत जिल्हा परिषदेला कळविले होते. मात्र, तरीही ते घेण्यात आले. आता या गुरुजींना अथवा त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची बाधा झाली, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

 

कोरोना नियम पाळण्यासाठी बजावले होते. शाळांचे लेखापरिक्षण हे शाळेत जाऊनच व्हावे, याबद्दल आम्ही काही सांगू शकत नाही. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली. 
- जी. जी. सय्यद, गटशिक्षणाधिकारी, श्रीगोंदे 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of curfew by teachers in Shrigonda