राष्ट्रीय सेवा योजनेतून घडते उद्याच्या सुंदर भारताचे उमदे नेतृत्व

NSS
NSS

संगमनेर (अहमदनगर) : महाविद्यालय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे उद्याच्या सुंदर भारताचे नेतृत्व घडविण्याचे प्रमुख व्यासपीठ आहे. महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव राष्ट्रीय सेवा योजनांच्या प्रणालीवर पडलेला असल्याचे प्रतिपादन डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी केले. संगमनेर महाविद्यालयात 'महात्मा गांधीजींचे स्वच्छता संकल्पन' या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. 

डॉ. ढगे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक गाव, खेड्यांचे जतन करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. स्वच्छता अभियानात हे सातत्याने आघाडीवर असतात. स्वच्छतेचा संबंध जातीशी जोडला जाण्यात गफलत झाली आहे. भारतात या क्षेत्रात काम करणारे 99 टक्के कामगार वयाची साठी पूर्ण होण्यापूर्वीच विविध आजाराचे बळी ठरतात. 

ग्रामीण भागात एक व्यक्ती दररोज सरासरी 300 ग्रॅम व शहरी भागात 325 ग्रॅम कचरा निर्माण करते. भारतामध्ये एका मिनिटात जवळजवळ 60 हजार प्लॅस्टिक बाटल्या फेकल्या जातात. तर सुमारे सात हजार अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च दरवर्षी स्वच्छतेवर होतो. त्यामुळे आपण आपले घर, परिसर, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या या अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान सातत्याने महत्वपूर्ण राहिले आहे. कोविड काळात सुमारे 40 लाख स्वयंसेवक योगदान देत आहेत. दुसऱ्याचे हित जपण्याची शिकवण राष्ट्रीय सेवा योजना देत असते. म्हणून उद्याच्या सुंदर भारताचे उमदे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे घडत असते.

महात्मा गांधीजींच्या आचार, विचारांचा जगावर मोठा प्रभाव पडलेला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात भगवंताच्या निष्ठेने निरोगी ठेवणाऱ्या स्वच्छतेला महत्त्व दिले होते. खेड्यांचा विकास देशाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. जैविक व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने खेड्यातील शेतीचा विकास होणे आवश्यक असल्याचे गांधीजींनी समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी महाविद्यालयीन जीवनात आयुष्याला आकार देणाऱ्या महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या दोन व्यक्तिमत्त्वांचा आदर्श बाळगावा. 

गांधीजींच्या 'खेड्याकडे चला' या संदेशाचा आदर्श घेऊन, संगमनेर महाविद्यालयाने पाच गावे दत्तक घेतली आहेत. या गावातील समस्य़ांचा अभ्यास करून, विकास योजनांद्वारे निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करुन दिला जात असल्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सुरज काळे यांनी केले. प्रास्ताविक मयुरी मेंगाळ हिने केले तर आभार वैष्णवी थिटमे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रताप फलफले, डॉ. सचिन कदम, प्रा. ललिता मालसुरे, प्रा. संदीप देशमुख व प्रा. सारिका पेरणे यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : सुस्मिता वडतिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com