लोकनियुक्त सरपंचाविरुद्धच्या अविश्‍वास प्रस्तावासाठी गुप्त मतदान; म्हैसगावात एक हजार मतदार रांगेत

विलास कुलकर्णी
Wednesday, 2 December 2020

म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

राहुरी (अहमदनगर) : म्हैसगाव येथे लोकनियुक्त सरपंच महेश गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर विशेष ग्रामसभा घेण्यात आली. नंतर, जिल्हा परिषद शाळेतील चार मतदान केंद्रांवर शांततेत गुप्त मतदान प्रक्रिया सुरू झाली. एक हजारावर मतदारांनी रांगा लावल्या.

सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. लोकनियुक्त सरपंच यांना हटवायचे की, कायम ठेवायचे. याचा सर्वोच्च अधिकार ग्रामसभेला मिळाल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

म्हैसगाव येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली. गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके उपस्थित होते. 

सभेसमोर बोलतांना तहसीलदार शेख म्हणाले, ग्रामपंचायत सदस्यांनी २३ ऑक्टोबरला तीन चतुर्थांश बहुमताने सरपंच गागरे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर केला. मतपत्रिकेत पहिल्या क्रमांकावर "अविश्वास प्रस्तावाला माझी संमती आहे." दुसऱ्या क्रमांकावर "अविश्वास प्रस्तावाला संमती नाही." असा उल्लेख केला आहे. त्या समोरील चौकोनात बाणफुलीचा शिक्का मारून, मतदान करायचे आहे. तत्पूर्वी, मतदान यादीनुसार नाव नोंदणी करून, चिठ्ठी घेऊन, मतदान केंद्रात प्रवेश करावा."

सकाळी साडेदहा वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान केंद्र समोर ग्रामस्थांनी रांगा लावल्या. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. महिला, वृद्ध व अपंग मतदारांनी मतदान केले. मतपत्रिकेवर चिन्ह नसल्याने, मतदान करतांना निरक्षर मतदार गोंधळले. त्यांनी दिसेल त्या चौकोनात शिक्का मारून, मतदानाचा हक्क बजावला."

लोकनियुक्त सरपंच गागरे यांनी सरपंचपद अबाधित राहील. जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. असा विश्वास व्यक्त केला. तर, उपसरपंच सागर दुधाट यांनी सरपंच यांच्या निष्क्रिय कारभारामुळे अविश्वास प्रस्ताव आणला. ग्रामसभेत मतदार सरपंचाविरुद्ध मतदान करतील. असा विश्वास व्यक्त केला.

"एकुण २२७७ मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी १५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. २० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. दुपारी तीन वाजता मतमोजणी सुरू होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. सरपंचपद रद्द झाले. तर, सदस्यांमधून सरपंच निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया होईल." अशी माहिती तहसीलदार शेख यांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for no confidence motion begins in Mahesgaon in Rahuri taluka