देशात होते साजरी वसुबारस; अकोले, नंदूरबारचे आदिवासी करतात वाघबारस

शांताराम काळे
Thursday, 12 November 2020

वसुबारस म्हणजेच वाघबारसेच्या दिवशी गुराखी नेहमीप्रमाणे गायी चरण्यास जंगलात जातात. सर्व गुराखी उपवास करतात.

अकोले : देशभरात वसुबारस साजरी केली जाते. या दिवशी शेतकऱ्याचे धन असलेल्या गायीची पूजा केली जाते. शास्त्रातही या पूजनाबद्दलची माहिती सांगितली आहे. मात्र, आदिवासी गायीची नव्हे तर वाघाची पूजा करतात. मोर, चंद्र, नागदेवता अशी वन्य प्राण्यांना पूजतात.

वाघदेवतेच्या पूजनाने आदिवासींनी दिवाळी सणाला प्रारंभ केला. आदिवासी पारंपरिक नृत्य, वाघदेवतेचे पूजन, मिरवणूक, पारंपरिक वाद्ये वाजवीत 10 गावांतील ग्रामस्थांनी देवतेपुढे नतमस्तक होत वाघबारस साजरी केली. 

तालुक्‍यातील पाचनई, पेठ्याची वाडी, कुमशेत, जानेवाडी, आंबीत, लव्हाळी ओतूर, लव्हाळी कोतूळ, शिरपुंजे, धामणगाव, हेंगाडवाडी येथील शिवेवरील वाघदेवतेच्या नावाने दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते. कोरोनामुळे यंदा यात्रा न भरविता वाघदेवतेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

वसुबारस म्हणजेच वाघबारसेच्या दिवशी गुराखी नेहमीप्रमाणे गायी चरण्यास जंगलात जातात. सर्व गुराखी उपवास करतात. दुपारी 10 गावांतील गुराखी, ग्रामस्थ वाघदेवतेजवळ जमा होतात. प्रत्येक गावाच्या सीमेवर वाघदेवेच्या मूर्तीचा दगडावर ताठ चिरा स्थापन करतात. त्यावर चंद्र, सूर्य, नागदेवता, वाघदेव, मोर आदी चित्रे कोरलेली असतात.

वाघदेवाला शेंदूर लावून नवीन आलेले भातपीक, नागली, वरई, उडीद वाहून पूजा केली जाते. डोंगऱ्या देव, रानभूल, गावदेवी हिरवदेव, निळा देव, रानवा लक्ष्मी गाय आदींची पूजा केली जाते. पाचनई येथे कोरोनामुळे यात्रा न भरवता वाघदेवतेच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waghbaras are done by the tribals of Akole, Nandurbar