
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वाटप केलेल्या "अर्सेनिक अल्बम-30'च्या गोळ्या असलेल्या लहान डबीमध्ये पाण्याचे द्रव आढळले आहेत.
शेवगाव (अहमदनगर) : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना वाटप केलेल्या "अर्सेनिक अल्बम-30'च्या गोळ्या असलेल्या लहान डबीमध्ये पाण्याचे द्रव आढळले आहेत.
वाघोली (ता. शेवगाव) येथे आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. "अर्सेनिक अल्बम-30' च्या गोळ्या वाटपात पहिल्यास घासाला "खडा' लागल्याने उलट-सुटल चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्याच तालुक्यात हा प्रकार उघडकीस आल्याने कारवाई कशी होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीचे व्याज जमा करून जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील कोरोना संसर्गात नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी "अर्सेनिक अल्बम -30' च्या गोळ्या असलेल्या डब्या वाटप केल्या. या गोळ्या पुण्यातील एका कंपनीकडून मागविण्यात आल्या आहेत. शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायतींना पंचायत समितीमार्फत गोळ्याचे वितरण करण्यात आले.
पंचायत समितीतून गोळ्या घेऊन जाण्यासाठी फोन आल्याने वाघोली ग्रामपंचायतीचे शिपाई बबन बोरुडे गुरुवारी (ता. 31) या गोळ्याची पाकिटे गावी नेले. प्रत्येकी 200 डब्या असलेली सहा पाकिटे यांना मिळाली होती. आज सकाळी ग्रामस्थांना आशा कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्याचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, तत्पूर्वी डबीची तपासणी केली असता त्यात गोळ्यांऐवजी पांढऱ्या रंगाचा चिकट द्रवपदार्थ आढळून आला.
त्यामुळे तातडीने त्याचे वाटप रद्द करण्यात आले. जिल्हा परिषदेने दोन-चार महिने वारंवार चर्चा व उशिरा वाटप केल्याबाबत आधीच चर्चा सुरू आहे. त्यात आज झालेल्या प्रकारामुळे वाघोली ग्रामस्थ संतप्त झाले. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या गलथान कारभाराबाबत भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांनी पंचायत समितीसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
गुऱ्हाळानंतर गोळ्याचे वादंग
जिल्हा परिषदेकडून अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीसाठी अनेक दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. वारंवार चर्चा झाल्यानंतर गोळ्या खरेदीचा निर्णय झाला आणि त्या गोळ्या खरेदी केल्या. आता कोरोनाची लस उंबऱ्याठ्यावर येऊन ठेपली असता जिल्हा परिषदेने गोळ्या वाटण्यास सुरूवात केली. आता गोळ्यांच्या डबीमध्ये पाण्यासारखे द्रव निघाल्याने समाजमाध्यमांमध्ये वादंग सुरू झाले.
कोरोनासंसर्ग कमी झाल्यानंतर नागरिकांना वाटप करण्यात येत असलेल्या या गोळ्या नेमक्या कोणाच्या सोयीसाठी खरेदी केल्या, याची चौकशी करण्यात यावी. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळणाऱ्या जिल्हा परिषद अधिकारी- पदाधिकाऱ्यांचा जाहीर निषेध करतो, असे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग यांनी सांगितले.
अर्सेनिक गोळ्याचे जिल्ह्यात वाटप सुरू झाले आहे. त्या गोळ्यांबाबत शेवगाव तालुक्यातून तक्रारी आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधून अद्यापपर्यंत तक्रार आलेली नाही. शेवगाव तालुक्यातील तक्रारीची चौकशी करण्यात येईल.
- राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
संपादन : अशोक मुरुमकर