तरुण पाण्यात आडकल्याचे समजताच धरणाचे ११ आकरा दरवाजे केले बंद

विलास कुलकर्णी
Wednesday, 2 September 2020

मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणाचे अकरा दरवाजे उघडले. प्रचंड वेगाने जलप्रपात धरणाच्या दरवाजा खालील स्थिर पात्रात कोसळून, नदीपात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागला. स्थिर पात्राच्या मधोमध असलेल्या भिंतीवर एक तरुण अडकला. पाण्याने वेढलेल्या तरुणाला पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच उघडलेले सर्व दरवाजे पुन्हा बंद केले. दरवाजांच्याखाली स्थिर पात्राच्या भिंतीवर अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. १५ मिनिटांनी पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. धनराज बर्डे (वय २०, रा. नांदगाव) असे अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. ते दृश्य पाहण्यासाठी आलेला धनराज बर्डे थेट दरवाजांच्या खाली असलेल्या स्थिर पात्राच्या भिंतीवर चढला. पहिले तीन दरवाजे उघडले. धनराज भांबावला. तसाच बसून राहिला. सकाळी साडेनऊवाजेपर्यंत सर्व ११ दरवाजे उघडले. झपाट्याने स्थिर पात्रात पडलेले पाणी मुळा नदी पात्राच्या दिशेने वेगाने वाहू लागले. धनराजच्या चारही बाजूने पाण्याने वेढा दिला. धनराज अडकला.

पर्यटकांसह उपस्थित काही पत्रकारांनी एक तरुण पाण्याने वेढलेल्या भिंतीवर बसल्याचे पाहिले. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पत्रकारांनी जलसंपदा खात्याचे धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून, घटनेची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी तातडीने दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. पाणी कमी झाले. धनराजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. पंधरा- वीस मिनिटे धनराज पाण्याने वेढला होता. त्याच्या जवळून दोन हजार क्युसेक प्रतिसेकंद वेगाने प्रचंड आवाज करीत जलप्रपात नदीपात्रात वेगाने जात होता. नशीब बलवत्तर म्हणून धनराजचे प्राण वाचले.

घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने काही उत्साही पर्यटक दरवाजा खाली असलेल्या स्थिर पात्रात पोहण्यासाठी उतरले होते. तर, काही पर्यटक स्थिर पात्राच्या भिंतीवरून, वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून चालत होते.  अत्यंत धोकादायक ठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात वावरत होते. त्यामुळे, या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवणे गरजेचे झाले आहे.

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील म्हणाल्या, धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर सावधानतेसाठी तीन वेळा भोंगा वाजविण्यात आला. परंतु, उत्साही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन बसतात. अडकलेल्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. धरण क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.  जलसंपदाची कर्मचारी संख्या अपुरी असल्याने, पर्यटकांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water has been released due to overflow of Mula dam