esakal | शेवगावला दहा दिवसांआड पाणी, कोविड सेंटरही तहानलेले
sakal

बोलून बातमी शोधा

water

शेवगावला दहा दिवसांआड पाणी, कोविड सेंटरही तहानलेले

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : जीर्ण जलवाहिन्या, तसेच वादळी वाऱ्यामुळे खंडित होणारा वीजपुरवठा, अशा अनेक तांत्रिक कारणांमुळे शहरातील नागरिकांवर ऐन उन्हाळ्यात "पाणी देता का पाणी' म्हणण्याची वेळ आली आहे. शेवगाव- पाथर्डी पाणीपुरवठा योजनेतून आठ ते दहा दिवसांच्या अंतराने होणारा पाणीपुरवठा कोरोना संकटात नागरिकांप्रमाणेच कोविड सेंटरमधील रुग्णांचीही परीक्षा पाहत आहे. (Water is available after ten days as the water scheme becomes obsolete)

जायकवाडीतील दहिफळ जॅकवेलवरून शेवगाव- पाथर्डीसह 54 गावांना पाणीपुरवठा केला जातो. ही योजना 25 वर्षांपूर्वीची असल्याने, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या पाण्याच्या कमी-अधिक दाबाने वारंवार फुटतात. दहिफळ जॅकवेलसाठी होणारा वीजपुरवठा वादळी वारे, अवकाळी पाऊस व इतर तांत्रिक कारणांमुळे वारंवार खंडित होतो.

हेही वाचा: लतादीदी नगरच्या डॉक्टरला म्हणाल्या, सदा सुखी रहा...

शेवगाव शहर व तालुक्‍यासाठी नियमित आवश्‍यक असलेला 35 ते 40 लाख लिटर पाणीउपसा योजनेतून होत नाही. त्यामुळे योजनेवरील गावे व शेवगाव नगरपालिका टाक्‍या भरण्यासाठी इतरांच्या व्हॉल्व्हवरून पाण्याची पळवापळवी करतात. भरमसाट अनधिकृत नळजोड, जलवाहिन्या व व्हॉल्व्हच्या सावळ्या गोंधळामुळे शेवगाव शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडलेले आहे.

पाणीपुरवठा कर्मचारी व्हॉल्व्हवर अवलंबून असलेल्या गल्लीतील ठराविक नागरिकांवर वेगवेगळ्या कारणांमुळे मेहेरबान असल्याने, जास्त वेळ पाणी सोडणे, अधिक संख्येने अनधिकृत नळजोड देणे, असे प्रकार शहरात सर्रास सुरू आहेत. पाणी उपलब्ध नसल्याने प्रसंगी विकतचे पाणी घेण्याची वेळ येते. यंदा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही ठेकेदार, नगरपालिका व महावितरण यांच्या सावळ्या गोंधळामुळे शहराला पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होत नाही.

दुर्गंधीमुळे नागरिकांचे हाल

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून, हात वारंवार स्वच्छ धुवा, वैयक्तिक स्वच्छता ठेवा, बाहेरून आल्यानंतर कपडे गरम पाण्यात टाकून धुवा, अशा वेगवेगळ्या उपाययोजना सांगितल्या जातात. मात्र, त्यासाठी लागणारा पाणीपुरवठा प्रशासनाकडूनच केला जात नाही. अस्वच्छ, अनियमित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

- सुभाष खोसे, नागरिक, शेवगाव

(Water is available after ten days as the water scheme becomes obsolete)