कोपरगावला सहा दिवसांआड पाणी, सर्व तलाव आटले

मनोज जोशी
Sunday, 6 December 2020

कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या येसगाव येथील चारही साठवण तलावात 95 टक्के पाणी संपले आहे.

कोपरगाव ः कोपरगाव नगरपालिकेच्या चार ही साठवण तलावातील 95 टक्के पाणी संपले आहे. शहराला केवळ एकच वेळ पाणीपुरवठा होऊ शकेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात पाणी पुरवठा सहा दिवसाआड करण्यात आला.

ऐन थंडीतसुद्धा पिण्याचे पाणी प्रश्न कोपरगावकरांची पाठ सोडेना झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आशुतोष काळे ,नगराध्यक्ष विजय वहाडणे, नगरसेवक, प्रशासन यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यात होकार दिला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या येसगाव येथील चारही साठवण तलावात 95 टक्के पाणी संपले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील,अभियंता दिगंबर वाघ यांनी साठवण तलावाची पाहणी करून केवळ एकच रोटेशन शहराला देऊ शकेल इतके पाणी शिल्लक असल्याने शहराचा पाणीपुरवठा सहा दिवसाआड करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराच्या तलावाना दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र दारणा धरणातून आवर्तन तसेच पिण्याचे पाणी सोडण्यास पाटबंधारे विभागाने चक्क नकार दिला होता. राहाता, वैजापूर या पालीकांसह, खाजगी उद्योगधंदे, शेतकरी यांची पाण्याबाबत कुठलीही मागणी नसल्याने केवळ कोपरगाव नगरपालिकेसाठी पाणी सोडणे शक्य होणार नाही अशी नकारघंटा पाटबंधारे विभागाने वाजवली.

आमदार आशुतोष काळे यांच्यासह नगराध्यक्ष वहाडणे यांनी पाणी प्रश्न महत्त्वाचा असून नागरिकांना पिण्यासाठी तरी किमान पाणी द्यावे लागेल, असा पाठपुरावा केल्याने अखेर पाटबंधारे विभागाने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची तयारी सुरू केली आहे, असेही सरोदे यांनी सांगितले. आता यापुढे पाणी दोन महिने पुरवावे लागणार आहेत, तसे पालिकेने नियोजन करणे आवश्यक आहे.

ऐन थंडीत कोपरगावकर यांचे पाण्यासाठी हाल होणार असून उन्हाळ्यात काय परिस्थिती राहील याबाबत विचार न केलेला बरा अशी उलट-सुलट प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

 

पाणी गळती, मुख्य वाहिनीवरील पाणी जोडबाबत पालिकेने कडक धोरण स्वीकारले पाहिजे. काहींवर मेहेरबानी का,बाकीचे नागरिक पट्टी भरत नाही का ?? नाहीतर सर्वांना मेन लाईनवर कॉंनेकशन द्या , हा भेद भाव का ?.पाच नंबर तळे पूर्ण करणे हाच त्यावर उपाय होऊ शकेल.

- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water to Kopargaon for six days