esakal | शेतकरी अस्वस्थ; बंधाऱ्याची पाणी गळती थांबेना
sakal

बोलून बातमी शोधा

Water leaked from the embankment on Kashi river in Nagar district

काशी नदीवरील बंधाऱ्यातून धो-धो वाहणारे पाणी मनोहारी वाटत असले, तरी परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा मात्र ओलावत आहेत.

शेतकरी अस्वस्थ; बंधाऱ्याची पाणी गळती थांबेना

sakal_logo
By
प्रवीण पाटील

बोधेगाव (अहमदनगर) : काशी नदीवरील बंधाऱ्यातून धो-धो वाहणारे पाणी मनोहारी वाटत असले, तरी परिसरातील शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा मात्र ओलावत आहेत. बंधाऱ्यात साचलेला गाळ व भिंतीतून होणारी पाणीगळती त्यांना अस्वस्थ करीत आहे. गळतीमुळे मागील काही वर्षांपासून, पावसाळा संपताच बंधारा कोरडा पडतो. 

चांगला पाऊस झाल्यावर काशीकेदारेश्वरच्या डोंगरकुशीतून झेपावणारी काशी नदी 25 किलोमीटर प्रवास करीत मुंगी येथे गोदावरीपात्रात सामावते. पाण्याचा प्रवास नागलवाडी, गोळेगाव, लाडजळगाव, बोधेगाव, हातगावमार्गे जानेवारी ते मार्चपर्यंत चालतो.

नदीवर अनेक बंधारे असल्याने, या नदीला परिसरातील शेतकरी जीवनवाहिनी म्हणतात. शेकडो हेक्‍टर जमीन ओलिताखाली येते. विहिरींना वर्षभर पाणी राहते. मात्र, काही ठिकाणी बंधाऱ्यांच्या देखभाल- दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. बोधेगावचा बंधाराही त्यांतील एक असून, गळतीमुळे त्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. गाळ भिंतीपर्यंत साचला असून, त्यात मोठी झाडे-झुडपे वाढल्याने पाणी टिकत नाही. दगडी भिंतीला भेगाही पडल्या आहेत. 

कोरड्या पडत असलेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहीरबागायतदार शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. 

सुरवातीला हा बंधारा खूप खोल होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचायचे. भर उन्हाळ्यात पाणी असायचे. विहिरींनाही बारमाही पाणी राहायचे. त्यावर परिसरातील शेकडो हेक्‍टर जमीन ओलिताखाली होती. काही वर्षांपासून मात्र गाळ, तसेच भिंतीला चिरा पडल्यामुळे बंधाऱ्यात पाणी टिकत नाही. आगामी उन्हाळ्यात तरी गाळ काढून दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 
- दीपक गायकवाड, शेतकरी, बोधेगाव 

संपादन : अशोक मुरुमकर