पोलिस वसाहत व राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयात पाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

पावसामुळे पोलिस वसाहतीतील घरांत पावसाचे पाणी गेले. त्यामुळे पोलिसांचे संसार उघड्यावर आले. हे पाणी गटाराचे असल्याने आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला. स्वस्तिक चौक परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातही काल सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची कागदपत्रे, संगणक उपकरणे वाचविण्यात चांगलीच दमछाक झाली.

नगर : शहरातील पोलिसांच्या मुख्य वसाहतीत काल (सोमवारी) झालेल्या पावसाच्या पाण्याने प्रवेश केला. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय, रेल्वे स्टेशन परिसरातील घरांतही पाणी गेल्याने महापालिकेच्या गटार सफाई कामासंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. 

पावसामुळे पोलिस वसाहतीतील घरांत पावसाचे पाणी गेले. त्यामुळे पोलिसांचे संसार उघड्यावर आले. हे पाणी गटाराचे असल्याने आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला. स्वस्तिक चौक परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातही काल सायंकाळी झालेल्या पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांची कागदपत्रे, संगणक उपकरणे वाचविण्यात चांगलीच दमछाक झाली. महापालिका प्रशासनाकडून रेल्वे स्टेशन परिसरात ड्रेनेजचे काम न झाल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेले. त्यामुळे संसारोपयोगी व इलेक्‍ट्रॉनिक वस्तू भिजल्याने मोठी आर्थिक हानी झाली. ही माहिती मिळताच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाले असून, पाणी काढण्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. 

गेल्या पाच दिवसांपासून नगर शहर व परिसरात पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी (ता. 28) रात्री झालेल्या दमदार पावसाने नगर शहर न्हाऊन निघाले. शहरासह तालुक्‍यात काल सकाळपर्यंत 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कालही दुपारपासून आकाशात ढग जमा झाले आणि पावणेचारच्या सुमारास आलेल्या पावसाने शहर परिसराला तासभर झोडपून काढले. पावसामुळे फेरीवाले व छोट्या व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली. महापालिका प्रशासनाने शहरात पावसाचे पाणी साचणार नाही याबाबत विशेष दक्षता घेतल्याचे दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत शहरात कोठेही पाणी साचल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे आलेली नाही. 

शहरातील नीलक्रांती चौक ते न्यू आर्टस कॉलेजपर्यंतचा रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा झाल्या तरीही रस्त्याच्या कडेच्या नालीचे काम न झाल्याने पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. मात्र, शहरातील सखल भागांत पाणी जमा झाले होते. नालेगाव, अमरधाम रस्ता, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, जुना टिळक रस्ता, कोठला, सर्जेपुरा, तेली खुंट, बोल्हेगावातील गणेश चौक परिसर आदी भागांत पावसाचे पाणी साचले होते. 

सलग पाच दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे सीना नदीला काल पुन्हा पूर आला होता. सकाळी काटवन खंडोबा रस्त्यावरील पुलावर नदीचे पाणी आले होते. नगर-कल्याण रस्त्यावरील सीना नदीपुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. आयएमएस कॉलेजसमोर नालेसफाई न झाल्याने नगर-औरंगाबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. नगर तालुक्‍यात नालेगाव, सावेडी, जेऊर, कापूरवाडी, भिंगार, चिचोंडी पाटील, रुईछत्तिशी, भिंगार, केडगाव, चास, वाळकी या मंडलांत दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in police colonies and state excise offices