आमच्या आजोबा, पणजोबांनी जमिनी दिल्या, पण पदरात काय

शांताराम काळे
Monday, 17 August 2020

भंडारदरा, घाटघरसह छोट्या- मोठ्या प्रकल्पात येथील भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या. त्यातून मोठे प्रकल्प उभे राहिले.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा, घाटघरसह छोट्या- मोठ्या प्रकल्पात येथील भूमिपुत्रांच्या जमिनी गेल्या. त्यातून मोठे प्रकल्प उभे राहिले. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. मात्र आजही येथील शेतकरी अडचणीत आहे. पाच महिने रोजगरविना वंचित असून पर्यटन व्यवसाय बंद आहे.

सरकारने त्याना पॅकेज देऊन भरीव मदत करावी, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी भंडारदरा येथे बोलताना केली. भंडारदरा जलाशय भरल्याने नऊ गावातील प्रकल्पग्रस्त व माजी आमदार वैभव पिचड यांनी जलशयाचे पूजन करून जलशयाला साडी- चोळी व श्रीफळ अर्पण करून जलपूजन केले. धरण आमच्या हक्काचे म्हणत हरहर महादेव अशा घोषणा देऊन शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

यावेळी राज्य पेसा सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग खाडे, आदिवासी उन्नतीचे अध्यक्ष भरत घाणे, संपत झडे, संतोष सोडणार, बुधा ईदे, सोमनाथ उदे उपस्थित होते. यावेळी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. भंडारदरा धरण ब्रिटीश काळात झाले, आज त्याला शंभर वर्षे पूर्ण झाले आहे. आमच्या आजोबा, पणजोबांनी जमिनी दिल्या. मात्र पदरात काय पडले. अजूनही साधा धरणग्रस्तांचा दाखला नाही. आमच्या शेतीला पाणी नाही, आमचे हक्काचे पाणी आम्हाला द्यावे, तसेच पाच महिन्यांपासून रोजगार नसल्याने आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

सरकारने शहरातील हॉटेल बीअर बार सुरू केले आहे. मग येथील पर्यटन टप्प्या- टप्प्याने अटी घालून सुरू केले. तर आमच्या पोरांच्या हाताला काम मिळेल. त्यातून आमचे घर प्रपंच चालतील. मात्र सरकार याबाबत का निर्णय घेत नाही. निर्णय घ्यायचा नसेल तर आम्हाला पॅकेज देऊन आमच्या मुला बाळाचा रोजी रोटीचा प्रश्न सोडवावा, अशी त्यांनी मागणी केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water pujan by former MLA Vaibhavrao Pichad at Bhandardara dam in Akole taluka