नगर जिल्ह्यातील ‘या’ १६ गावांचा पाणी लागला प्रश्‍न मार्गी

आनंद गायकवाड
Monday, 24 August 2020

तळेगाव परिसरातील 16 गावांसाठी प्रवरा नदीवरून थेट पाईपलाईन करुन आणलेल्या योजनेचे पाणी देवकौठे गावापर्यंत पोचले आहे. याप्रमाणेच निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांचा पाणी प्रश्न या प्रादेशिक योजनेमुळे मार्गी लागणार आहे.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील तळेगाव परिसरातील 16 गावांसाठी प्रवरा नदीवरून थेट पाईपलाईन करुन आणलेल्या योजनेचे पाणी देवकौठे गावापर्यंत पोचले आहे. याप्रमाणेच निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांचा पाणी प्रश्न या प्रादेशिक योजनेमुळे मार्गी लागणार आहे. 

भोजापूर धरणातून ग्रॅव्हिटीद्वारे या गावांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल. तसेच विजेच्या खर्चातही बचत होणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तालुक्यातील कऱ्हे फाटा येथील खंडोबा मंदीर येथे आज झालेल्या निमोण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या भुमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते.

ते म्हणाले, दुष्काळी पट्ट्यातील या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी भोजापूर धरणातून होणाऱ्या 15 किलोमिटर लांबीच्या पाणी पुरवठा योजनेतून निमोण, कऱ्हे, सोनेवाडी, पिंपळे व पळसखेडे या पाच गावांसाठी संगमनेर शहराला निळवंडे धरणातून ग्रॅव्हीटीद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या धर्तीवर ग्रॅव्हीटीने पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी भोजापूर धरणाजवळ जॅकवेलचे कामही वेगाने पूर्णत्वास जात आहे.

संगमनेर तालुका विकास कामातून सर्व क्षेत्रात आघाडीवर राहून राज्यात रोल मॉडेल ठरावा यासाठी कायम प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बी. आर. चकोर यांनी या कामासाठी लागणारी वनविभाग व प्रशासकिय पातळीवरची मंजूरी मिळून जलद गतीने काम होण्यासाठी, इंद्रजीत थोरात, मिरा चकोर यांच्या पाठपुराव्यातून मंत्री थोरातांनी मोठी मदत केल्याचे सांगितले. 

या वेळी बाबा ओहोळ, सुनंदा जोर्वेकर, आर. बी. राहाणे, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, अर्चना बालोडे, सुभाष सांगळे, संतोष हासे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. जी. सराफ, उपअभियंता एम. बी. क्षीरसागर, शाखा अभियंता अशोक लोणारे आदि उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water shortage in 16 villages in Nagar district will solve the problem