Water Shortage : नगरमध्ये पुन्हा पाणीटंचाई! उपनगरांना मिळते पाचव्या दिवशी पाणी

अहमदनगर शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
water issue
water issuesakal
Updated on

अहमदनगर - शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर गढूळ आणि मैलामिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

फेज टू, फेज १ व अमृत या तीन पाणी योजना असूनही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

आगरकर मळा, गाडळकर मळा, मनपा कर्मचारी वसाहत, दत्तनगर आदी भागात नळाला गढूळ आणि मैलामिश्रित पाणी येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. केडगाव उपनगराला पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे.

त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सावेडी, मध्यवर्ती शहर, मुकूंदनगर, बोल्हगाव- नागापूर या भागात देखील पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. शहर सुधारीत पाणी योजनांवर आतापर्यंत सुमारे तीनशे कोटी रूपये खर्च करण्यात आले.

अमृतचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र, मागील १४ वर्षांपासून हाती घेण्यात आलेल्या फेज टू योजनेच्या काही अंतर्गत जलवाहिन्या अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यातच आहे त्या जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडत असल्याने शहरात वारंवार पाणी टंचाई निर्माण होत आहे.

पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळण्याचे नगरकरांचे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून अधुरेच आहे.

कर्मचाऱ्यांची वानवा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात अभियंते व इतर कर्मचाऱ्यांची वानवा आहे. कत्रांटी पद्धतीने काही कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली असली, तरी पाणी वितरण व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही. पाणी सोडण्याचे नियोजन वारंवार कोलमडत आहे. परिणामी नागरिकांना वेळोवेळी कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

वितरणाचे नियोजन कोलमडले

कल्याण रोड, बुरूडगाव, सारसनगर, कोटला, आरटीओ, लालटाकी, सावेडी उपनगर, तसेच केडगाव उपनगर आदी भागात पाण्याच्या ३५ टाक्या आहेत. परंतु त्यातील अनेक टाक्यांपर्यंत अद्याप फेज टू चे पाणी पोहचलेच नाही. वसंत टेकडी येथे पाणी आल्यानंतर शहरातील टाक्या पाण्याने भरल्या जातात. मात्र, त्यानंतरचे पाणी वितरणाचे नियोजन कोलमडत असल्याने शहरात महिन्यातून किमान दोन वेळा तरी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होते.

पाणीपट्टी भरणारे वाऱ्यावर

शहरात सुमारे एक लाख ३१ हजार मालमत्तांची नोंद आहे. मात्र, अधिकृत नळजोडांची संख्या ५२ हजार एवढीच आहे. त्यामुळे उर्वरित मालमत्तांना पाणी मिळते कसे? हा प्रश्‍नच आहे. अनधिकृत नळजोडांमुळे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना त्यांचे हक्काचे मुबलक पाणी वेळेत मिळत नाही. महापालिका प्रशासन या अनधिकृत नळजोड धारकांकडे दुर्लक्ष करत आहे.

पाणी योजनांवरील खर्च

  • फेज - १४४ कोटी

  • फेज टू - ११६ कोटी

  • अमृत - १४० कोटी

  • नळजोड - ५२ हजार

  • एकूण टाक्या - ३५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.