Amhadnagar News : शटडाउनमुळे कोलमडले पाणीपुरवठ्याचे नियोजन

उपनगरांमधील अनेक भागात नियोजित वेळेतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला
Electricity Shutdown
Electricity ShutdownSakal

अहमदनगर - महावितरणने घेतलेल्या शटडाउनमुळे शहर पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. केडगाव, सावेडी, बोल्हेगाव उपनगरांमधील अनेक भागात नियोजित वेळेतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गुलमोहर रोड परिसरात तर गेल्या पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नगरकरांना भर उन्हाळ्यात कृत्रिम निर्जळीला तोंड द्यावे लागत आहे.

पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी महावितरणने शनिवारी दिवसभरासाठी शटडाऊन घेतला. त्यामुळे वसंत टेकडी येथील पंपिंगस्टेशनमधून पाणी उपसा होऊ शकला नाही. त्यातच शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. परिणामी अनेक भागातील नियोजित पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या केडगाव उपनगराला चार दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. ड्रिमसिटीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तोडण्याचा प्रकार पाणीटंचाईमुळेच घडला आहे.

पाईपलाईन परिसरातील कादंबरी नगरीमध्ये मागील पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. येथील काही कुटुंबांना तर स्वःखर्चाने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. बोल्हेगाव उपनगरातदेखील अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. गुलमोहर रोड परिसरात रस्त्यांची कामे सुरू होती. या कामामुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली होती. त्यामुळे या भागात गेल्या पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

मोटार जोडूनही मिळेना पाणी

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा मोठा प्रश्न उपनगरांमधील नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. मोठ्या वसाहतींमध्ये एकाच पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. अशा ठिकाणी शेवटच्या टोकाच्या घरांना कमी दाबाने पाणी मिळते. नाईलाजास्तव त्यांना नळांनाच विद्युत मोटारी जोडाव्या लागतात. तरीदेखील काहींना पुरेसे पाणी मिळत नाही.

शटडाऊनमुळे काही भागात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. मात्र, शटडाऊन वगळता इतर वेळी पाणीपुरवठा करण्यास कोणतीही अडचण नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असलेल्या भागांची पाहणी करू.

- परिमल निकम, पाणीपुरवठा अधिकारी.

गुलमोहर रोड परिसरात पंधरा दिवसांपासून पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेचे संबंधित अधिकारी त्याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. पाणीपुरवठ्यात अडचण असेल तेव्हा महापालिकेने टँकरने पाणी द्यावे.

- मुकूल गंधे, नागरिक, गुलमोहर रोड परिसर.

कादंबरी नगरीत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. पंधरा दिवस झाले, पुरेसे पाणी मिळत नाही. नळाला विद्युत मोटार जोडावी लागते, तेव्हा कुठे थोडेफार पाणी मिळते. महापालिकेने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे.

- अमर बनसोडे, नागरिक, कादंबरी नगरी.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com