सामाजिक संदेश देणारी लग्नपत्रिका समाजमाध्यमात व्हायरल; पिंप्रीलौकी अजमपूरच्या युवकाचा उपक्रम

आनंद गायकवाड
Wednesday, 18 November 2020

नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेल्या युवकाचा विवाह शिबलापूर येथील वधुसमवेत ठरला आहे. 22 नोव्हेंबरला होणाऱ्या या विवाहसोहळ्याची पत्रिका समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाली आहे.

संगमनेर (अहमदनगर) : नोकरीनिमित्त अमेरिकेत असलेल्या युवकाचा विवाह शिबलापूर येथील वधुसमवेत ठरला आहे. 22 नोव्हेंबरला होणाऱ्या या विवाहसोहळ्याची पत्रिका समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाली आहे. पारंपरिक नावांची जंत्रावळी टाळून, विविध लोकोपयोगी सामाजिक संदेश देताना जनजागृती करणाऱ्या या लग्नपत्रिकेने अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अजमपूर येथील सोमनाथ व सुनिता गिते यांचा मुलगा विशाल हा नोकरीनिमित्त अमेरिकेत असतो. त्याचा विवाह शिबलापूर (ता. संगमनेर) येथील सुभाष व ललीता बोद्रें यांची मुलगी कांचन सोबत आश्वी शिबलापूर रत्यावरील मंगल कार्यालयात रविवारी (ता. 22) होणार आहे.

आपल्याकडे विवाहाच्या निमंत्रण पत्रीकेत पारंवरिक पध्दतीने आशीर्वाद, पुण्यास्मरण, प्रमुख उपस्थिती, आपले नम्र, व्यावस्थापक, कार्यवाहक, काका, मामा, किलबील परिवार आदींच्या नावांची जंत्रावळी छापलेली असते. सर्व नातेवाईक व आप्तेष्ट सुखावत असले तरी ही लग्नपत्रिका पूर्ण वाचण्याचे कष्टही कोणी घेत नाही. या पार्श्वभुमिवर जग पाहिलेल्या विशालने स्वतःची लग्नपत्रिका वेगळ्या पध्दतीने छापण्याचा विचार केला. त्यासाठी वधुवरांचे आई वडील व वेळ, तारिख व विवाहस्थळ सोडून इतर नावांना फाटा देण्यात आला आहे.

समाजातील घटणारे मुलींचे प्रमाण, बेटी बचाओ बेटी पढाओ, वृक्षतोडीमुळे वाढलेली ग्लोबल वॉर्मिंग, जय जवान, जय किसान, जाती निर्मूलन, पाणी वाचवा, रक्तदान, नेत्रदान, स्वच्छ व सुंदर भारत असे विविध सामाजिक संदेश छापून प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. या विवाहाच्या वेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून, ही लग्नपत्रिका समाज माध्यमावर वेगाने व्हायरल झाली असून परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding invitation card with social messages go viral on social media