वजन, दराची माहिती मोबाईलवर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

लॉकडाउननंतर आता बाजार सुरळीत होत असून, येथून आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कांदा पाठविला जातो. आठ दिवसांत येथून 400 मालमोटारींतून 80 हजार कांदागोण्या परराज्यांत गेल्या आहेत.

श्रीरामपूर : बाजार समितीत विक्रीस आणलेल्या कांद्याचे वजन व दराची माहिती संबंधित शेतकऱ्याच्या मोबाईलवर पाठविण्याची सुविधा बाजार समितीने सुरू केली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्याला कांद्याचे वजन व दराची माहिती तत्काळ मिळणे सोयीस्कर झाले आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीत कांदालिलाव रोज होत असल्याने आवकही वाढली आहे. आज 13 हजार 960 कांदागोण्यांची आवक झाली. 

हेही वाचा ः सौ शेरी, एक संगमनेरी पण आता कोरोना ठरतोय भारी... बाधित सेंच्युरीच्या वाटेवर

शेतकऱ्यांनी बाजारात आणलेल्या उच्च प्रतीच्या कांद्यास आज एक हजार रुपये दर मिळाला. लॉकडाउन काळात कांदालिलाव ठप्प झाले होते. प्रारंभी काही काळ येथील लिलाव सुरू करण्यात आले; मात्र वाढती गर्दी लक्षात घेता, प्रशासनाच्या सूचनेनंतर पुन्हा ते बंद ठेवण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती.

लॉकडाउनमध्ये कांदा पडून असल्याने तो खराब होण्याची वेळ आली होती. प्रशासनाने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर लिलाव हळूहळू सुरळीत होत आहेत. बाजार समितीने रोज लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

सध्या येथील बाजार समितीत दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढत आहे. सलग तीन दिवस कांद्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली. बाजारात सध्या 20 टक्के चांगला, तर 80 टक्के निवडलेला कांदा येत आहे. एकीकडे पावसात कांदा भिजण्याची भीती, तर दुसरीकडे खरिपाची लगबग सुरू असल्याने शेतकरी कांदाविक्री करीत आहेत.

लॉकडाउननंतर आता बाजार सुरळीत होत असून, येथून आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कांदा पाठविला जातो. आठ दिवसांत येथून 400 मालमोटारींतून 80 हजार कांदागोण्या परराज्यांत गेल्या आहेत. सध्या पूर्ण क्षमतेने लिलाव होत असल्याने तालुक्‍यासह वैजापूर तालुक्‍यातील शेतकरी येथे कांदा विक्रीसाठी आणतात.

उच्च प्रतीचा कांदा 700 ते एक हजार रुपये, मध्यम प्रतीसाठी 400 ते 660 रुपये, तर जोडकांद्यास 100 ते 300 रुपये दर आज मिळाला. 

कांद्याचे वजन व मिळालेल्या दराची माहिती मोबाईलद्वारे मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. ही सुविधा आता सुरू झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने माहिती मिळत आहे. याबरोबरच लिलावाची रक्कम त्याच दिवशी सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा केली जाते. रोजच्या लिलावामुळे आवकही वाढत आहे. 
- किशोर कालंगडे, कांदाव्यापारी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weight, rate information on mobile