अशोक कारखान्याचे चाक यंदा सहा महिने फिरणार

गौरव साळुंके
Tuesday, 20 October 2020

अशोक सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या वर्षीच्या 64 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आमदार मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.

श्रीरामपूर ः शहरासह तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमध्ये अशोक सहकारी साखर कारखान्याचा मोलाचा वाटा आहे. यंदा कोरोनाचे संकट असतांनाही कारखान्याचे अधिकारी, कामगार व व्यवस्थापनाने परिश्रम घेऊन गळीताचे नियोजन केले आहे. त्यामुळे अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अधिक ऊस असला तरी सर्व ऊस उत्पादकांच्या ऊसाचे संपूर्ण गाळप केले जणार असल्याची, ग्वाही अशोक उद्योग समुहाचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली.

अशोक सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या वर्षीच्या 64 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आमदार मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक आदिनाथ त्यांची पत्नी शोभा झुराळे तसेच कारखान्याचे गॅरेज इनचार्ज रमेश, त्यांची पत्नी सविता आढाव दाम्पत्यांच्या हस्ते विधीवत बॉयलर पूजन करण्यात आले. 

या प्रसंगी मुरकुटे म्हणाले, मागील वर्षी साखरेला भाव कमी आणि गाळपही कमी झाल्याने कारखाना तोट्यात होता. परंतु यंदा कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे अधिक असल्याने गाळप चांगले होईल. यंदा सुमारे सहा महिने कारखाना चालणार असुन दररोज साडे चार हजार मेट्रीक टनापर्यंत ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट्य आहे.

तसेच ऊस गाळपाबरोबरच डिस्टीलरी, इथेनॉल व सहविजनिर्मिती प्रकल्पाच्याही उत्पादनात वाढ होणार असल्याचा विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला. प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी प्रास्तविकात यंदाच्या गळीत हंगामाविषयी माहिती दिली. संचालक अभिषेक खंडागळे यांनी सुत्रसंचलन केले. तर उपाध्यक्ष पोपट जाधव यांनी आभार मानले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कहांडळ, माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, सोपान राऊत, दिगंबर शिंदे, बाबासाहेब ढोकचौळे, लाल पटेल, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मत धुमाळ, माणिक पवार, माजी सभापती सुनिता गायकवाड, अ‍ॅड. डी. आर. पटारे, भाऊसाहेब पटारे, नारायण बडाख, सखाहरी शिंदे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, प्राचार्य अंजाबापू शिंदे, डॉ. माधव पगारे, रईस शेख, निरज मुरकुटे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेसह शारिरीक अंतराच्या नियमांचे पालन केले.
संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wheel of Ashok factory will turn for six months this year