
संगमनेर (अहमदनगर) : तालुक्याच्या पठार भागातील सावरगावतळ येथील मोहिमाळ परिसरातील वनक्षेत्राला रविवार ( ता. 14 ) रोजी दुपारी एकच्या सुमारास अचानकपणे मोठा वणवा लागला होता. मात्र वनसंपदेविषयी अधीकच जागृत असलेले स्थानिक युवक व महिलांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे वणवा आटोक्यात आणून, वनसंपदा वाचविण्यात यश आले आहे.
वनसंपदेच्या बाबतीत संपन्न असलेल्या तालुक्यातील सावरगावतळ या गावाच्या परिसरात सुमारे आठशे हेक्टरपेक्षा अधिक वनक्षेत्र लाभले आहे. दाट जंगलामध्ये अनेक दुर्मिळ औषधी वनस्पतींसह विविध प्रकारची झाडे झुडूपे असून, स्थानिक ग्रामस्थांनी या वनसंपत्तीचे प्राणपणाने जतन केले आहे. या ठिकाणी आजपर्यंत लागलेल्या वणव्यांचे अरिष्ट युवक व ग्रामस्थांनी झुंज देवून परतवल्याने आजवर वनसंपत्तीचे रक्षण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर जंगली पशु पक्षी व हिंस्त्र श्वापदांचाही येथे मोठ्या प्रमाणावर वावर आहे.
ग्रामस्थ व वनविभाग येथील वनसंपत्ती अधीक संपन्न होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानकपणे येथील वनक्षेत्रावरील काही भागाला अचानकपणे मोठा वणवा लागला. या आगीने थोड्याच वेळात उग्र रुप धारण केले. या दुर्घटनेची माहिती समजताच पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी याबाबत वनविभागाला कळवून, ते येण्याची वाट न पाहता, युवकांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत युवक, शालेय विद्यार्थी व महिला अशा सुमारे 100 जणांनी वनक्षेत्राकडे धाव घेत, हिरव्या झुडूपांच्या सहाय्याने वाळलेल्या गवतात पसरु पाहणाऱ्या आगीवर झोडपून विझवण्यास प्रारंभ केला.
दरम्यान वनविभागाचे वनपाल रामदास डोंगरे, वनरक्षक चैतन्य कासार, एकनाथ राहाणे, शिपाई पुनाजी मेंगाळ यांचे पथकही घटनास्थळी मदतीसाठी पोचले. दुपारची वेळ असल्याने जोरदार हवा व उन्हाच्या तडाख्यामुळे वणवा आटोक्यात आणणे अवघड होते. मात्र सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तासाभरात वणव्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तरीही या घटनेत सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावरील वनसंपदा जळाली असली तरी, उर्वरित वनसंपदा वाचविण्यात यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.