गेले थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला आले मित्राला संपवून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर कारवाई केली असून, त्यातील एक फरार असून दोघांना अटक केली आहे.

संगमनेर ः संगमनेरकर नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटीत असतानाच, किरकोळ कारणावरुन शहरातील मदिनानगर परिसरात दोन युवकांना तीन जणांनी मारहाण केली. यात चाकूसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर झाल्याने, एक जण गंभीर जखमी झाला.

पोलिसांनी या प्रकरणी तिघांवर कारवाई केली असून, त्यातील एक फरार असून दोघांना अटक केली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवार ( ता. 31 ) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मदिनानगर गल्ली क्रमांक 1 मध्ये राहणारे साहिल व अर्शद मणियार हे मित्र गल्लीत गप्पा मारीत बसले होते. त्यावेळी फैजल अब्रार शेख, अब्रार रऊफ शेख व इम्रान रऊफ शेख यांनी तेथे येवून तुम्ही महिलांकडे पाहून आरडाओरड का करता असा जाब विचारून त्यांना अर्वाच्च शिवागाळी करुन मारहाण केली.

या वेळी एकाने साहील मणियार याच्या पोटात चाकूने भोकसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी आसपासचे रहिवासी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला. त्या दोघांनाही तातडीने उपचारार्थ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र साहिलची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक निरीक्षक रोहिदास माळी यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी सोहेल रशिद मनियार यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींवर खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण करुन शिवागाळी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, यातील अब्रार रऊफ शेख व इम्रान रऊफ शेख यांना आज पहाटे अटक केली तर फैजल शेख फरार झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास माळी करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: While celebrating Thirty First, he stabbed his friend