esakal | शेवगावात होतोय व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची लूट
sakal

बोलून बातमी शोधा

White gold is being looted from traders in Shevgaon

कवडीमोलाने कापूस देणे शेतकऱ्यांना भाग पडत आहे. पावसाचा 60 ते 70 टक्के कापूस क्षेत्राला फटका बसला. त्यामुळे एकरी अवघा चार ते पाच क्विंटल कापूस हाती येण्याची चिन्हे आहेत.

शेवगावात होतोय व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची लूट

sakal_logo
By
राजू घुगरे

अमरापूर : पावसाने आधीच कापूसउत्पादकांचे कंबरडे मोडले. मोठ्या कष्टाने आलेला कापूस घेताना व्यापारी भाव पाडून शेतकऱ्यांना खिंडीत गाठत आहेत. त्यामुळे यंदा शेतकरी पावसाच्या अस्मानी व व्यापाऱ्यांच्या सुलतानी संकटात सापडला आहे. 

शेवगाव तालुक्‍यात सर्वाधिक कपाशीलागवड होते. तालुका पांढऱ्या सोन्याचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा 41 हजार हेक्‍टरवर कपाशी लागवड झाली. मात्र, जूनपासूनच कापूसउत्पादकांमागे पावसाचे दुष्ट चक्र लागले. सततच्या पावसाने पिकात पाणी साचून कपाशीची वाढ खुंटली. वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. परिणामी, औषधफवारणी, खते, मशागतीवर मोठा खर्च झाला.

आता कापूस निघण्यास सुरवात झाली असली, तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतात वेचणीस आलेला कापूस भिजून, त्यातील सरकी काळी पडून मोड आले. पांढऱ्या शुभ्र कापसाचा रंग बदलला. त्याचा परिणाम उत्पादनावर नि उत्पन्नावरही झाला. मजुरांना 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे कापूसवेचणीची मजुरी देऊनही ते फिरकत नाहीत. 

वेचलेला कापूस वाळवून विक्रीसाठी नेला, तरी व्यापारी भिजलेला कापूस म्हणून भाव पाडून मागतात. शासनाचा हमी भाव 5500 रुपये क्विंटल असताना, अवघ्या दोन-तीन हजार रुपये क्विंटलने कापूस घेतला जातो. त्यातून पिकावर झालेला खर्च, केलेली मेहनतही निघत नाही. मात्र, सणासुदीच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्याय नाही.

कवडीमोलाने कापूस देणे शेतकऱ्यांना भाग पडत आहे. पावसाचा 60 ते 70 टक्के कापूस क्षेत्राला फटका बसला. त्यामुळे एकरी अवघा चार ते पाच क्विंटल कापूस हाती येण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तालुक्‍यात सुरू नसल्याने व्यापाऱ्यांनी त्याचा फायदा उठवला आहे. तालुक्‍यातील सर्व छोट्या-मोठ्या गावांत, रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी खरेदी केंद्रे थाटली आहेत. तेथे कापूस खरेदी करून तो वाहनांतून परराज्यांत पाठविला जात आहे. 


गेल्या वर्षी तालुक्‍यात दोन ठिकाणी केंद्र सरकारचे सीसीआय व राज्य सरकारचे फेडरेशन यांच्यामार्फत शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला. या वर्षीही खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक थांबवावी. 
- आप्पासाहेब हरदास, शेतकरी, वडुले बुद्रुक 

loading image
go to top