काँग्रेसचे युवक ज्येष्ठांवर का आहेत नाराज, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबेंनीही लिहिले पत्र

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

मंत्र्यांनी दौरा करीत असताना संबंधित जिल्ह्यांमधील युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवणे गरजेचे आहे. मी स्वतः कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांना राज्यातील सर्व युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी फोन क्रमांकांसह पोच केलेली आहे.

नगर: राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. बारा जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आहेत. परंतु त्यांच्याकडून युवक कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. कोणत्याही समितीवर त्यांची वर्णी लागत नाही. त्यामुळे काँग्रेसची ही तरूण मंडळी ज्येष्ठांवर नाराज आहे. त्यांनी प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे. तांबे यांनीही निवेदनाद्वारे आपल्या भावना ज्येष्ठांच्या कानावर घातल्या आहेत.

महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना हे निवेदन दिले आहे. त्याची प्रत मल्लिकार्जुन खर्गे यांनाही पाठवली आहे. निवेदनात म्हटले आहे, की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन आता सात महिने होत आले आहेत. राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे पालकमंत्री, तर सर्वच 36 जिल्ह्यांत आपण पक्षसंघटनेच्या कामाच्या समन्वयासाठी संपर्कमंत्री नेमलेले आहेत. सर्वच जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या जिल्हास्तरीय, तसेच तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक कॉंग्रेसला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली आहे.

 

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या फाळकेंसाठी भाजपच्या माजी मंत्र्यांची शिफारस

मंत्र्यांनी दौरा करीत असताना संबंधित जिल्ह्यांमधील युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना सोबत ठेवणे गरजेचे आहे. मी स्वतः कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांना राज्यातील सर्व युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी फोन क्रमांकांसह पोच केलेली आहे. राज्यात कॉंग्रेस पक्षाच्या संघटनाबांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू होणे गरजेचे आहे. या प्रक्रियेतून पक्षाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आणण्यामध्ये युवक कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. 2019च्या विधानसभा 

निवडणुकीत युवक कॉंग्रेसने जिवाचे रान करून पक्षाच्या उमेदवारांचे काम केले. युवकांचा जाहीरनामा, सुपर 60, वेक-अप महाराष्ट्र यांसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. 16 हजारांपेक्षा अधिक रक्तबाटल्या गोळा करून, एक विक्रम केला आहे. युवक कॉंग्रेस संघटना पूर्णपणे झोकून देऊन काम करीत असेल, तर वरिष्ठ नेत्यांनीदेखील त्यांची पाठ थोपटून शाबासकी द्यावी, हीच आमची माफक अपेक्षा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Congress youth are angry with senior State President Satyajit Tambe also wrote a letter