esakal | पंढरीला जाताना गंगागिरी महाराज का जाळायचे झोपडी, साईंबाबांना म्हणायचे, हा हिरा आहे शिर्डीकरांनो
sakal

बोलून बातमी शोधा

Why did Gangagir Maharaj burn the hut on his way to Pandhari?

दोन चांदीच्या डब्यापैकी एकीत शिर्डी येथील गुरूस्थान मंदिराजवळील पवित्र माती व दुसरीत साईबाबांची उदी ठेवण्यात आली आहे.

पंढरीला जाताना गंगागिरी महाराज का जाळायचे झोपडी, साईंबाबांना म्हणायचे, हा हिरा आहे शिर्डीकरांनो

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः जगाला श्रध्दा व सबुरीचा संदेश देणारे साईबाबा आणि त्यांचा परिचय जगाला करून देणारे वैराग्यमूर्ती गंगागिरी महाराज या महान संताच्या भेटीच्या स्मृती आज कालकूपीत बंद करण्यात आल्या.

उद्या (ता.20) ही कालकुपी महंत गंगागिरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सरला बेटावरील (ता. श्रीरामपूर) जमिनीच्या पोटात ठेवली जाईल. या बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते हा सोहळा विधिवत संपन्न होईल.

साई समाधी शताब्दी वर्षानिमीत्त, दोन वर्षापूर्वी या दोन महान संताच्या भेटीच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सदगुरू गंगागिरी महाराज यांचा 171 हरिमान सप्ताह शिर्डीत संपन्न झाला. त्यातून उरलेल्या एक कोटी रूपयांच्या लोकवर्गणीतून या बेटावर साई समाधी शताब्दी धर्मशाळा बांधण्यात आली.

या धर्मशाळेच्या इमारीसमोरील विस्तीर्ण मैदानातील जमिनीच्या पोटात ही कालकूपी ठेवली जाईल. पुढे काळाच्या ओघात होणा-या उलथापालथीनंतरही ही कुपी या दोन महान संताच्या भेटीच्या इतिहास मानवजाती समोर उलगडून दाखविण्यास कारणीभूत ठरेल. 

चिनी मातीपासून तयार केलेल्या कुपीत सुबक नक्षीकाम असलेल्या दोन चांदीच्या डब्यापैकी एकीत शिर्डी येथील गुरूस्थान मंदिराजवळील पवित्र माती व दुसरीत साईबाबांची उदी ठेवण्यात आली आहे. चांदीच्या पत्र्यावर कोरलेला या हरिनाम सप्ताहाचा जमाखर्च, हरिनाम सप्ताहाचा अहवाल, हरिनाम सप्ताह व साई समाधीनिमीत्ताने तयार करण्यात आलेली चांदीची नाणी, टाळ व सध्या प्रचलित असलेली नाणी तसेच सरला बेटाची सविस्तर माहिती असलेला पेन ड्राईव्ह आदी वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

या कुपीचे तोंड लाखेच्या आवरणाने बंद करण्यात आले आहे. साईमंदिरातील लक्ष्मीपूजनात या कुपीचे पूजन करण्यात आले. 
वारकरी सांप्रदायाचा प्रचार व प्रसार करणारे सदगुरू गंगागीर महाराज वैराग्यमूर्ती म्हणून ओळखले जात. मागे काही पाश नको या कारणास्तव दरवर्षी पंढरीच्या वारीला जाताना बेटावरील आपली झोपडी जाळून टाकीत.

ते एकदा शिर्डीत आले, त्यांची आणि तरूणपणातील साईबाबांची गाठ पडली. हा हिरा आहे हिरा अशा शब्दात त्यांनी शिर्डीकरांना साईंची महती सांगितली. या प्रसंगाचे वर्णन या कुपीतील दस्तऐवजात करण्यात आले आहे. 

महंत रामगिरी महाराज यांच्या समोर शिर्डी ग्रामस्थांनी या कालकूपीचा संकल्पना मांडली. त्यास त्यांनी मान्यता देऊन, ती जमिनीच्या पोटात ठेवण्याची जागा देखील निश्‍चित करून दिली. शिर्डी ग्रामस्थ, साईसंस्थान व सरला बेटातील विश्वस्त मंडळ आदींच्या सहभागातून ही कालकुपी तयार केली आहे. येत्या 26 नोव्हेंबर रोजी महंत रामगीरी महाराज यांच्या हस्ते या बेटावरील साई शताब्दी धर्मशाळेच्या नूतन इमारतीचे उदघाटन होणार आहे. 
कमलाकर कोते, श्रीक्षेत्र सरला बेट. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image