मंत्री बच्चू कडू का निघालेत भारतीय जनता पक्षात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला त्यावेळी वेळोवेळी धारेवर धरलं होतं. त्यांची मते त्यांना पटायची नाही. परंतु आता ते स्वतः सरकारमध्ये असताना भाजपमध्ये जायला निघाले आहेत.

नगर ः मंत्री बच्चू कडू म्हणजे एक घाव दोन तुकडे असाच त्यांचा स्वभाव आहे. तो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. काम झालं पाहिजे हाच त्यांचा स्थायी भाव. एखादी गोष्ट नाही पटली की ते लगेच व्यक्त होतात. स्पष्टपणे मते मांडतात, प्रसंगी आपल्याच सरकारलाही धारेवर धरायला मागेपुढे पाहत नाहीत.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला त्यावेळी वेळोवेळी धारेवर धरलं होतं. त्यांची मते त्यांना पटायची नाही. परंतु आता ते स्वतः सरकारमध्ये असताना भाजपमध्ये जायला निघाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू आहे. परंतु नेमके कोणत्या कारणाने बच्चूभाई असे म्हणालेत...

""केंद्र सरकारने शेतमालाचा 50 टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतमाल खरेदी करावा. असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी विधेयकांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन,'' असा उपरोधिक टोला लगावतानाच, बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नसल्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

जलसंपदा कार्यालयात दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन मंत्री कडू यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्य सरकारने नाकारला आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कोणताही कायदा करताना, आमच्या संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या दोन मागण्या त्यात घ्याव्यात. शेतमालाचा 50 टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतमाल खरेदी करावा.'' 

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढी वातावरणनिर्मिती केली, त्या प्रमाणात त्यांना विजय मिळाला नाही. या निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही पडसाद उमटणार नाहीत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. बिहार निवडणुकीत त्याचा अनुभव आल्याचे मंत्री कडू यांनी सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Minister Bachchu Kadu join the Bharatiya Janata Party nagar news