कर्जत, राशीन स्टँडवरील चोऱ्यांचा झाला उलगडा

नीलेश दिवटे
Sunday, 3 January 2021

या बाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांना सूचना देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणण्याबाबत आणि प्रवाशांना सतर्क करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

कर्जत : कर्जत आणि राशीन येथील एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेत लूट करणाऱ्या महिलेला पोलिसांनी पकडले आहे. अर्चना अजय भोसले (वय 21, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) असे सदर महिलेचे नावं असून तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, कर्जत आणि राशीन बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची नजर चुकवून किंवा दिशाभूल करून रोख रक्कम, मौल्यवान दागिने, साहित्य तसेच पॉकेट चोऱ्या होत होत्या.

या बाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांना सूचना देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणण्याबाबत आणि प्रवाशांना सतर्क करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

सदर प्रकरणी गुप्त बातमीदार तयार करून माहिती काढून महिला आरोपीस  ताब्यात घेऊन चौकशी केली असता राशीन बस स्थानकावरील पर्स चोरीचा गुन्हा तिने कबूल केला. तिच्याकडून चोरी गेलेला 2 हजार चारशे रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राशीन पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलिस निरक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस जवान सलीम शेख, गणेश ठोंबरे, भाऊसाहेब काळे, महिला पोलिस कर्मचारी शबनम शेख यांनी केली. पुढील तपास शेख आणि काळे करीत आहेत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman was found stealing from Karjat and Rashin stands