घंटागाडीची उंची वाढली; कचरा टाकण्यासाठी महिलांनी शोधला ‘असा’ पर्याय

सचिन सातपुते
Tuesday, 8 September 2020

शहरातील कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या नगरपालिकेच्या घंटागाडयांची उंची जास्त असल्याने त्यात कचरा टाकण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते.

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या नगरपालिकेच्या घंटागाडयांची उंची जास्त असल्याने त्यात कचरा टाकण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ओटयांचा वापर करुन कचरा गाडीत टाकावा लागत असल्याने घंटीगाडयांची अशी रचना नेमकी कोणाच्या सोयीसाठी केली? असा प्रश्न आता शेवगावकरांना पडला आहे. याबाबत महिलांनी आंदोलन करुन दोन तास घंटागाडी रोखून धरत नगरपालिकेचे लक्ष वेधले. 

शहरातील कचरा संकलनाचे काम टेंडर संपल्यामुळे सध्या नगरपालिकेकडे आहे. त्यासाठी सात घंटागाडया आहेत. त्यातील तीन पूर्वीच्या तर चार नव्याने घेण्यात आलेल्या आहेत. त्या चारही गाडयांची अदयाप उपप्रादेशीक वाहतुक कार्यालयाकडे नोंदणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे विनाक्रमांकाच्या असून कचरा संकलनाचे काम करतात. 

या गाडयांची बांधणी करतांना त्यांची उंची प्रमाणापेक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यात कचरा टाकण्यासाठी नागरीकांना व महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा तर ओटयाचा किंवा उंच जागेचा वापर करुन कचरा त्यात टाकावा लागतो. मात्र गल्लीत गाडी आल्यानंतर अशी उंच जागा उपलब्ध नसल्यास तो कचरा गाडीतील कचरा कुंडीत न जाता काही रस्त्यावर तर काही टाकणा-या महिलांच्या अंगावर पडतो. त्यामुळे गाडी कचरा टाकणे म्हणजे मोठया जिकीरीची बाब होवून बसली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घंटागाडीतील कर्मचा-यांना सुरक्षेविषयक साधने उलब्ध नसल्याने ते हातात कचरा घेवून गाडीत टाकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नागरीक व महिलांसोबत वादाचे प्रसंग निर्माण होतात. सोमवारी नेवासे रस्त्यावरील सिध्दीविनाक काँलनीत घंटागाडीतील कर्मचारी व महिलांची याच कारणावरुन वाद झाला.

अंजली कुलकर्णी, माधूरी पाटील, रचना पाटील, शीतल बोरा, उषा दहिवाळकर, स्मिता देशपांडे, पल्लवी पांडव आदी महिलांनी दोन तास घंटागाडी अडवली. त्यानंतर नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्याशी चर्चा केली असता गाडीची उंची कमी करणार असल्याचे त्यांनी सांगितली. 

माधुरी पाटील म्हणाल्या, घंटागाडीच्या उंचीबाबत गेल्या अनेक दिवसापासून तक्रार करत आहेत. आता मुख्याधिका-यांनी दोन दिवसाची मुदत दिली आहे. मात्र त्यानंतरही या गाडयांची उंची कमी न केल्यास रस्त्यावर कचरा टाकून नगरपालिकेचा निषेध करणार आहोत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women agitation against the municipality in Shevgaon