
बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक झाल्यास 25 लाखांचा निधी देण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी दिले आहे. त्यानुसार, तालुक्यातील गावपुढारी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
निघोज : तालुक्यातील सर्वात मोठी निघोज ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार नीलेश लंके यांनी बोलाविलेल्या बैठकीत पुढाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत, सर्व जण राजी झाले असले, तरी गावातील दारूबंदी हटविल्याचा मुद्दा या बिनविरोध निवडीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.
बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक झाल्यास 25 लाखांचा निधी देण्याचे आश्वासन आमदार लंके यांनी दिले आहे. त्यानुसार, तालुक्यातील गावपुढारी ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राळेगणसिद्धी पाठोपाठ तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाची निघोजची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत.
लंके यांनी बोलविलेल्या बैठकीत माजी सरपंच ठकाराम लंके, रंगनाथ वराळ, सचिन वराळ, प्रभाकर कवाद यांनी लंके यांनाच योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार दिला. मात्र, सोमनाथ वरखडे यांनी आमच्या गटाला योग्य प्रतिनिधीत्व न मिळाल्यास स्वतंत्र तिसरे मंडळ उभे करणार असल्याची भूमिका घेतली.
सुरवातीला दोन किंवा तीन पॅनेलमध्ये लढत होण्याची चिन्हे होती. त्यानंतर सर्वांनी सत्ता व प्रतिनिधित्व समप्रमाणात विभागून घेण्याचा विचार पुढे आला. या विचारावर सहमती होण्याची शक्यता वाटत असताना, दारूबंदी चळवळीचे दत्ता भूकन यांनी गावात झालेली दारूबंदी उठविणारांना संधी देऊ नये, अशी भूमिका घेतली.
बबन कवाद यांनी गेल्या वेळेला पराभूत झालेल्या लोकांना यंदा बिनविरोध संधी देण्याची मागणी केली. प्रस्थापितांनी इतरांना संधी देण्याची मागणी तरुणांनी केली आहे. निघोजची दारूबंदी हटविणे ही गंभीर चूक असल्याचे लंके म्हणाले. मात्र, त्यातूनही काही तरी मार्ग काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे निघोजची निवडणूकही बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. अहमदनगर