शनिशिंगणापुरात राज्यातील सर्वाधिक उंच दीपस्तंभ; साडेपाच कोटी खर्च

विनायक दरंदले 
Sunday, 18 October 2020

शनैश्वर देवस्थान ट्रस्टने हाती घेतलेल्या पानसनाला सुशोभीकरण कामातील ७५ फुट उंचीच्या व साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दीपस्तंभचे काम पुर्ण झाले आहे. हा दिपस्तंभ राज्यात सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे.

सोनई (अहमदनगर) : शनैश्वर देवस्थान ट्रस्टने हाती घेतलेल्या पानसनाला सुशोभीकरण कामातील ७५ फुट उंचीच्या व साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम पुर्ण झाले आहे. हा दीपस्तंभ राज्यात सर्वाधिक उंचीचा ठरणार आहे.

स्वयंभू शनिमुर्ती वाहुन आलेल्या पानसनाला ओढ्याला गटारीचे स्वरुप आलेले होते. स्वयंभू मुर्तीचा इतिहास लक्षात घेवून पानसनाला ओढ्याच्या दुरावस्थेबाबत जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर विश्वस्त मंडळाने खर्चाचे सुशोभीकरण हाती घेतले होते.

शनिमुर्ती व महाद्वार समोर २७ बाय २७ ओट्यावर पंच्याहत्तर फुट उंचीचा भव्य दिपस्तंभ तयार झाला आहे. यासाठी कर्नाटकातून ग्रेनाईट दगड आणण्यात आला आहे. ठेकेदार जगदिश भट यांच्या मार्गदर्शनाखाली ५० कारागिर दोन वर्षापासून दगड घडवत होते. त्याची डिझाईन स्थापत्य अभियंता अभिजीत साधले (गोवा) यांनी केली आहे. सुशोभीकरण काम ठेकेदार दिलीप मते व आर. एन. रेपाळे पाहत आहेत.

शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गरज लक्षात घेवून येथे नऊ स्वतंत्र नवग्रह मंदीर होणार आहेत. दिपस्तंभाच्या बारा आणि पन्नास फुट उंचीवर आठ मंदीरे व दगडी हत्ती विराजमान होणार आहेत. तिनशे टनाहून अधिक दगडाचे वजन लक्षात घेवून दिपस्तंभाचा पाया २० फुट खोल करण्यात आला आहे. हा स्तंभ शिंगणापुरच्या वैभवात भर घालणारा ठरणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on 75 feet high lighthouse in Shanishinganapur is in final stage