नगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीपासून

सतीश वैजापूरकर
Thursday, 29 October 2020

सिन्नर, सावळीविहीर, शिर्डी ते नगर या अंतरातील 160 क्रमांकाचा हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग पुढे दौंड, बारामतीमार्गे थेट चिक्कोडीपर्यंत (कर्नाटक) जातो. सिन्नरपासून त्याचे काम वेगात सुरू आहे.

शिर्डी ः नगर-कोपरगाव राज्यमार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मात्र, राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना त्याचे दोन तुकडे झाले. सावळीविहीर ते नगर या अंतरातील रस्त्याला 160 क्रमांक, तर सावळीविहीर ते येवला अंतरातील रस्त्याला 752-जी, असा क्रमांक मिळाला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष सुखबीरसिंग संधू यांची आज भेट घेतली. सावळीविहीर ते नगर अंतरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम येत्या जानेवारीत सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, सावळीविहीर ते नगर राज्यमार्ग सात महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला. मात्र, राज्य सरकारने काम केलेला कोपरगाव ते नगरदरम्यान हा रस्ता निकृष्ट झाल्याने, दर पावसाळ्यात खड्ड्यांत जातो. यंदा त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर, खास बाब म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी 40 कोटी रुपये मंजूर केले. त्यातून खड्डे कसेबसे बुजविण्याचे काम सुरू आहे. ते येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करतात. 

सिन्नर, सावळीविहीर, शिर्डी ते नगर या अंतरातील 160 क्रमांकाचा हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग पुढे दौंड, बारामतीमार्गे थेट चिक्कोडीपर्यंत (कर्नाटक) जातो. सिन्नरपासून त्याचे काम वेगात सुरू आहे. ते कोपरगाव तालुक्‍याच्या हद्दीपर्यंत आले आहे. या संपूर्ण राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशीच परिस्थिती सावळीविहीर ते मालेगाव या 752-जी या राष्ट्रीय महामार्गाचीही आहे. हा रस्ताही चौपदरी होईल. त्याचीही निविदाप्रक्रिया सुरू आहे. 

तीन महिन्यांसाठी 40 कोटींचा खर्च 
कोपरगाव ते नगर या निकृष्ट रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी आजवर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्ची पडले. मात्र, रस्ता व्यवस्थित होत नाही. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला. मात्र, त्याची अवस्था एवढी दयनीय झाली, की तीन महिन्यांसाठी दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपये खर्चण्याची वेळ राज्य सरकारवर आली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on Ahmednagar-Savlivihir National Highway from January