खड्डे बुजविण्याच्या कामात शेवगावात माती; पुन्हा उखडण्याची भीती

सचिन सातपुते
Wednesday, 28 October 2020

पाच- सहा महिन्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करणाऱ्या शेवगावकरांना बांधकाम विभागाने खड्डे बुजवून तात्पुरता दिलासा दिला आहे.

शेवगाव (अहमदनगर) : पाच- सहा महिन्यांपासून रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करणाऱ्या शेवगावकरांना बांधकाम विभागाने खड्डे बुजवून तात्पुरता दिलासा दिला आहे; मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क कोरडी खडी व मातीमिश्रित मुरमाचा वापर केल्याने, दुरुस्तीचे काम "फार्स'च ठरणार आहे. 

जूनपासून सातत्याने झालेल्या पावसामुळे शहर व तालुक्‍यातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना जीवघेणी कसरत करीत वाहने चालवावी लागतात. खड्ड्यांची संख्या व त्यांची खोली जास्त असल्याने, त्यात पावसाचे पाणी साचून छोटे-मोठे अपघात होतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह विविध पक्षसंघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. 

आता पाऊस थांबल्याने शहरातील नगर, नेवासे, पाथर्डी, पैठण या रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरत्या स्वरूपातील डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहे. त्यात डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मोठी खडी व मातीमिश्रित मुरूम वापरला जात असल्याने, वाहनांमुळे खडी रस्त्यावर पसरून वाहतुकीला अडथळा ठरू लागली आहे.

माती व मुरूम वाहनांच्या चाकांमुळे उडून मागील वाहनचालकांच्या, तसेच पादचारी व दुकानदारांच्या नाका-तोंडात जात आहे. पाऊस झाल्यास खड्डे उघडे पडून वाहनचालकांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांवरील खड्डे डांबर व खडीच्या साहाय्याने बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of filling the potholes on the road has started in Shevgaon