औद्योगिक इमारतीच्या बांधकामावर टाच; मंजूरी दिलेल्या कामाला ग्रामस्थांचा विरोध

गौरव साळुंके 
Friday, 11 September 2020

बेलापूर- ऐनतपूर परिसरात तुकारामनगर येथे सुरु असलेले औद्योगिक इमारतीचे बांधकाम आराखड्यानुसार नसल्याचे आढळुन आल्याने पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी सदर बांधकामाचा परवाना रद्द केला आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : तालुक्यातील बेलापूर- ऐनतपूर परिसरात तुकारामनगर येथे सुरु असलेले औद्योगिक इमारतीचे बांधकाम आराखड्यानुसार नसल्याचे आढळुन आल्याने पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी सदर बांधकामाचा परवाना रद्द केला आहे. यासंर्दभात आभाळे यांनी बेलापूर ग्रामपंचायतीला पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

बेलापूर येथील तुकाराम नगर (बंगाळ वस्ती) येथे नागरी वसाहत परिसरात योगेश भगिरथ मुंडलिक यांनी पंचायत समितीकडे औद्योगिक इमारत बांधण्यासाठी परवाना मागितला होता. गेल्यावर्षी तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यास मंजूरी दिल्यानंतर मुंडलिक यांनी बांधकामास प्रारंभ केला. स्थानिक ग्रामस्थांनी त्यास विरोध दर्शवत ग्रामपंचायतीसह पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी आभाळे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहणी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर कार्यालयाचे शाखा अभियंता बी. एस. भालेराव यांनी सहकार्यांसह बांधकामास भेट देऊन पहाणी केली. त्यावेळी मुंडलिक यांनी मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे समोर आले. 

आराखडयात नमुद केल्यानुसार बाजुचे अंतर सोडलेले नसुन बांधकामाचे क्षेत्र आराखडयापेक्षा अधिक असल्याचे दिसुन आले. त्यामुळे मुंडलिक यांनी मंजूर आराखडयातील तरतुदीनुसार सदर बांधकाम केले नसल्याचा आहवाल भालेराव यांनी आभाळे यांना दिला.

पंचायत समितीने निवासी प्रयोजनासाठी बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. परंतु सदरचे बांधकाम औद्योगिक कारणासाठी होत असून ते तातडीने बंद करण्यात यावे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली होती. भालेराव यांनी सादर केलेल्या अहवालात आराखड्यानुसार बांधकाम केलेले नसल्याचे निदर्शणास येत असल्याने मुंडलीक यांना दिलेली बांधकामाची परवानागी रद्द केल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी दिली. ग्रामस्थांच्यावतीने भास्कर बंगाळ यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे तक्रार केली होती.

नागरी वसाहतीमध्ये औद्योगिक इमारतीचे बांधकाम करुन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे सदरच्या औद्योगिक व्यवसायावर बंदी आणावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली असुन यासंदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयासवरील मागणीचे निवेदन ऑनलाईन स्वरुपात पाठविले आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work on industrial building in Shrirampur taluka stopped