महसुलमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पंचायत समितीचे काम राज्यात दिशादर्शक

आनंद गायकवाड
Friday, 23 October 2020

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पंचायत समिती राज्यात आदर्श आणि दिशादर्शक काम करीत असल्याचे प्रतिपादन सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केले.

संगमनेर (अहमदनगर) : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर पंचायत समिती राज्यात आदर्श आणि दिशादर्शक काम करीत असल्याचे प्रतिपादन सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केले. संगमनेर तालुक्याचा पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जिल्ह्यात एक नंबर लागल्याने शिक्षक संघटनेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. 

या वेळी झालेल्या बैठकीत बोलताना उपसभापती नवनाथ अरगडे यांनी शिक्षक संघटनांच्या पुढाकारातून कोरोना नियंत्रणाच्या लढाईत सर्व प्राथमिक शिक्षक सक्रिय आहेत. तर जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून आपला शिक्षण विभाग राज्यभरात अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले. 

या वेळी झालेल्या बैठकीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या दिशानिर्देशानुसार शाळा बंद शिक्षण सुरु या जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका मिळाव्यात. शाळांमधील रजिस्टर नंबर एकच्या जतनासाठी लॅमिनेशन, संगणकीकरण किंवा अन्य पर्यायाची तरतूद करावी, स्थायित्व प्रमाणपत्र प्रस्ताव मंजूर नसलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात. पदवीधर शिक्षकांच्या वेतन निश्चीतीतील त्रुटी दूर कराव्यात. तसेच समान तारखेला सेवेत आलेल्या शिक्षकांचे वेतन समान असावे. 2004 मध्ये सेवेत आलेल्या शिक्षकांचे सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे सर्व हप्ते भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा व्हावेत. पगार बिलासंबंधी एकवाक्यता ठेवून खर्चासाठी कमीतकमी रक्कम घ्यावी.

तालुक्यातील सर्व ऑनलाईन व ऑफलाईन पगारबीले दर एकसारखा असावा. शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करण्यासाठी संघटनेच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन करावे. स्थायित्व प्रमाणपत्र आणि मागील पाच वर्षांचे गोपनीय अभिलेखे यांची नोंद सेवापुस्तकात करावी. शिक्षण घेण्याचे कार्योत्तर आणि कार्यपूर्व प्रस्तावांना विशिष्ट कालमर्यादेत मंजुरी मिळावी. डीसीपीएस खातेधारक शिक्षकांच्या कपाती हिशोब स्लिपा मिळण्याबाबत जिल्हा परिषद अर्थ विभागास पत्रव्यवहार करावा. मेडिकल बिले, कोविड आजाराची बिले, तसेच रजा ड्युटी पे बिले त्वरित मंजूर करावीत. तसेच श्रमिक संघाकडे शासन निर्णयानुसार नोंदणीकृत संघटनेमार्फत आलेल्या निवेदनांवर संदर्भासहित लेखी प्रतिसाद देण्याची, तसेच बैठकीचे इतिवृत्त ठेवणे व संबंधित संघटनेला ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी निश्चित करणे आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. 

या बैठकीत सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही सभापती व उपसभापतींनी दिली. यावेळी जिल्हा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर. पी. राहाणे, भाऊसाहेब ढोकरे, भीमराज उगलमुगले, सोमनाथ घुले, संतोष भोर, भाऊसाहेब एरंडे, संजय आंबरे, सत्यवान गडगे, मच्छिन्द्र ढोकरे, अशोक शेटे, किरण मिंडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास पवार, विस्ताराधिकारी सुवर्णा फटांगरे, अरुण जोर्वेकर, राजेंद्र बिल्लाडे, एन. के. गाढे आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Sangamner Panchayat Samiti under the guidance of the Revenue Minister is a guideline in the state